हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मार्च महिन्यांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) थांबायचं नाव घेत नाही. सध्या सुरू असलेल्या एप्रिल महिन्यातही काही दिवसांपासून मराठवाड्यात गारपिटीचा पाऊस झाला आहे. यामुळे बीड, हिंगोली, परभणी तालुक्यात दोन दिवस झाले गारपीटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये टोमॅटो, बटाटा, कांदा, बाजरी इत्यादी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तसेच बीड जिल्ह्यातही हीच परिस्थिती पहायला मिळते.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. गारपीटीने फळभाजा आणि हरभरा, ज्वारी, गहू या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच हिंगोली या तालुक्यात देखील अवकाळी पावसाने पिकं जमीनदोस्त झाल्याचे समजते. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात (९एप्रिल) या दिवशी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. यामुळे पिकांचे नुकसान झाले. एवढच नाही तर बीड जिल्ह्यातील अष्टी, पटोडा, गेवराई, केज तालुक्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह तडाखा लावला आहे.
परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी तसेच तालुक्यात एरंडेश्वर, दैठणा, गंगाखेड, खळी, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव तसेच मानवत तालुक्यातील रामपुरी तालुक्यातील अवकाळी पावसाने हजेरी लावली. याच पावसामुळे चिलंतवाडीतील एका घरावर वीज कोसळली. त्या घराच्या भिंतींना आणि स्लॅबला तडे गेले. यासह काही उपकरणे जळाली आहेत.