Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात. कांद्याचे दर असतील उसाचे दर असतील यावरून राजू शेट्टी हे कायम सरकार विरोधात आंदोलन करत असतात. सध्या देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सध्या रसायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील 22 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे कारखान्यांकडे असलेल्या अतिरिक्त निधीमधून शेतकऱ्याला अंतिम बिलापोटी 400 रुपये मिळावेत. अशी मोठी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारकडे केली आहे.
ही मागणी पूर्ण होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 13 सप्टेंबर रोजी कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर या मोर्चामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे देखील आवाहन करण्यात येत आहे.
राजू शेट्टी यांचा गंभीर इशारा
शेतकऱ्याच्या मागणीचा विचार केला नाही तर गळीत हंगामात साखर कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत. असा गंभीर इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, मागच्या दोन वर्षापासून आम्ही सरकारकडे ऊसदर नियंत्रण समिती स्थापन करण्याची मागणी करतोय मात्र सरकारने महिनाभरापूर्वी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन केली आहे.
दरम्यान साखरेचे दर जागतिक बाजारपेठेमध्ये वाढले आहेत. याच गोष्टीचा विचार करून एफआरपी निश्चित झाली होती. मात्र साखर कारखान्यांना साखर, इथेनॉल आणि इतर उत्पादनातून प्रतिक्विंटल पाचशे रुपये जादा मिळाले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील अंतिम बिलापोटी प्रति टन किमान चारशे रुपये द्यावेत असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.
शेतकरी मोठ्या संकटात
सध्या ऑगस्ट महिना संपत आला आहे तरी म्हणावा असा पाऊस राज्यामध्ये पडलेला नाही. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत खरीप पिके उगवून आली आहेत. मात्र सध्या या पिकाला पावसाची गरज आहे. मात्र पाऊस नसल्यामुळे ही पिके सुकू लागली आहेत. पुढील पाच-सहा दिवसात जर पाऊस आला नाही तर ही पिके जळून जातील असे देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.