हॅलो कृषी ऑनलाईन : वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील सत्तर सावंगा धरणास (Sattar Sawanga Dam) मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. गोदावरी खोऱ्यातील पैनगंगा उपखोऱ्यात धामणी गावाजवळ अडाण नदीवर हे (Sattar Sawanga Dam) धरण बांधण्यात येणार आहे. या धरणासाठीच्या 173 कोटी 9 लाख रुपयांच्या खर्चास शुक्रवारी (ता. 17) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.
या धरणामुळे वाशिम जिल्ह्यातील सत्तर सावंगा, धामणी, खडी, पिंपळशेंडा, एकांबा आणि आमगव्हाण या 6 गावातील 1 हजार 345 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना या धरणाचा मोठा फायदा होणार असून, या धरणामुळे या भागातील पाटबंधारे अनुशेष भरून निघण्यास मदत होणार आहे. धरण भागात बांधणीनंतर कालवे काढण्यात येणार नसून, लाभधारक स्वत:च्या खर्चाने पाण्याचा उपसा करू शकणार आहेत. असे मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पाच धरणे (Sattar Sawanga Dam Maharashtra Government)
वाशीम जिल्ह्यात सद्यस्थितीत अडाण, अडोल, एकबुर्जी, सोनाळा, वाथोड ही प्रमुख पाच धरणे व अन्य लघु सिंचन प्रकल्प आहेत. अडाण धरण हे मातीच्या व दगडाच्या भरावातुन बांधण्यात आले आहे. हे धरण जिल्ह्यातील कारंजा-लाड-अडाण नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाचा उद्देश सिंचन व पाणीपुरवठा हा आहे. अडोल धरण हे जिल्ह्यातील बोराळा गावानजिक बांधण्यात आले असून, त्याचे बांधकाम मातीच्या भरावाचे आहे. एकबुर्जी धरण हे चंद्रभागा नदीवर बांधण्यात आले असून, या धरणातील पाण्याचा वापर प्रामुख्याने सिंचनासाठी व वाशीम शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी केला जातो. सोनाळा धरण हे जिल्ह्यामधील मंगळूरपीर गावात अरुणा नदीवर बांधलेले मातीचे धरण असून, या धरणातील पाण्याचा वापर प्रामुख्याने सिंचनासाठी केला जातो. वाथोड धरण हे जिल्ह्यातील मनोरा शहरापासून सुमारे 5.9 किलोमीटर बांधण्यात आले आहेत.
सिंचन क्षेत्रात वाढ होणार
1964 ते 1990 या कालावधीत महाराष्ट्र सरकारकडून वाशिम जिल्ह्यात अडाण, अडोल, एकबुर्जी, सोनाळा, वाथोड ही धरणे बांधण्यात आली आहे. त्यातच आता जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील धामणी गावाजवळ सत्तर सावंगा धरणास सरकारकडून मान्यता मिळाल्याने जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.