सातबारा, मिळकत पत्रिकांवर आता ‘यूएलपीन’ बंधनकारक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्व सातबारा उतारे आणि मिळकत पत्रिकांवर यापुढे ‘अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक’ (यूएलपीन नंबर) देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे ही सूचना केंद्र शासनाने केली होती.

महसूल व वन विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. सातबारा, मिळकत पत्रिकांवर आता ‘यूएलपीन’ (युनिफाइड लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर) क्रमांक दर्शविण्यासाठी महसूल यंत्रणेला मान्यता देण्यात आल्याचे यात नमूद केले आहे. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे नियम १९७१ मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे केंद्राला देखील आता कोणत्याही मालमत्तेचा शोध घेणे सोपे होणार आहे.

ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी सरिता नरके म्हणाल्या, ‘‘केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांना महसूल दस्तऐवज जतन व वापर करण्याची पद्धत सुटसुटीत व संगणकीय करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मालमत्तेशी संबंधित दस्तऐवजांवर यूएलपीन वापरण्याची सूचना संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारताला केली गेली होती. त्यामुळे सर्व राज्यांमधील दस्तऐवजांचे सुसूत्रीकरण होण्यास मदत होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्राने यूएलपीनबाबत देशभर सूचना दिल्या आहेत.’’

दरम्यान, शासनाने यूएलपीन क्रमांक देण्याच्या निर्णयानंतर देखील सातबारा व मिळकत उताऱ्यांवरील आधीचे क्रमांक कायम राहणार आहेत. ‘‘राज्यात आधीपासून गावनिहाय दस्तऐवज जतन केले आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील महसुली दफ्तरांमध्ये पहिल्या क्रमांकापासून सुरुवात केली जाते. आता मात्र यूएलपीन येणार असल्यामुळे देशातील कोणत्याही मालमत्ता दस्तावर स्वतंत्र क्रमांक येतील व त्याची ओळख तत्काळ पटवणे शक्य होणार आहे,’’ असे महसूल विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

असे होणार सातबारा उताऱ्यावरील बदल

— गट क्रमांक व उपविभागाच्या उल्लेखाआधी आता यूएलपीन क्रमांक टाकला जाईल.
–यूएलपी संबंधीचा स्कॅन केला जाणारा क्यूआर कोड आता गाव नमुना क्रमांक सात उताऱ्यावर उजवीकडील कोपऱ्यात असेल. तेथे यूएलपीन क्रमांकदेखील दिला जाईल.
–पत्रिकेच्या मध्यभागी महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह असेल.
–पत्रिकेवरील पहिल्या ओळीच्या वरील डाव्या बाजूला यूएलपीन क्रमांक दिला जाईल.
–यूएलपी संबंधीचा स्कॅन केला जाणारा क्यूआर कोड आता पत्रिकेच्या दर्शनी भागात उजवीकडील कोपऱ्यात असेल.
–तेथे यूएलपीन क्रमांकदेखील दिला जाईल.

स्रोत : ऍग्रोवन

 

 

error: Content is protected !!