Agriculture news : सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन आणि कापसाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल आहेत. मात्र पावसामधून बचावून काही ठिकाणी सोयाबीन आणि कापूस हे पिके बहरले आहे मात्र आता त्या पिकांवर देखील कीड लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभा राहिले आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे देखील मोठे संकट उभे राहिले आहे. सोयाबीनवर शंखी गोगलगाय तर कापसावर ढब्बू पैशाची कीड लागल्याने उभी पिकं नेस्तनाबूत होत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
मागच्या काही दिवसापासून राज्यांमध्ये तुफान पाऊस होत आहे मात्र जुलै महिना संपला तरी देखील बीडमध्ये म्हणावा असा पाऊस झाला नाही. तरी देखील त्या ठिकाणी काही प्रमाणात पेरण्या झाल्या असून उगवून आलेले सोयाबीन आणि कापसावर मोठ्या प्रमाणामध्ये गोगलगाय आणि ढब्बू पैशा किडीचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे तर दुसरीकडे पिकांवर पडलेल्या किडीमुळे मोठे संकट उभा राहिले आहे. त्यामुळे आता शेतकरी हतबल झाले आहेत.
माहितीनुसार, बीडच्या आंबेजोगाई, केज, परळी या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गोगलगाय सडा पडला आहे. उगवून आलेले पीक मोठ होण्याच्या आतच गोगलगाय त्याला फस्त करून टाकतायेत त्यामुळे शेतकऱ्यांना दररोज गोगलगाय वेचण्यासाठी शेतामध्ये मेहनत घ्यावी लागत आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे उभे पिक नष्ट व्हायला लागले आहे. (Agriculture news)
सरकारने मदत करावी
आधीच अस्मानी संकटामुळे येथील शेतकरी चिंतेत आहेत. त्याचबरोबर गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हे शेतकरी चांगले संकटात सापडले आहेत. पिक विमा मिळाला नाही, अतिवृष्टीचे अनुदान नाही त्यामुळे आता जर पेरणी करायची म्हटली तर पेरणी करायची कुठून? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.