Snail Control In Agriculture: मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे शंखी गोगलगायीचा वाढलाय प्रादुर्भाव; तज्ज्ञांनी सुचविले ‘हे’ एकात्मिक नियंत्रण उपाय!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: या वर्षी मराठवाड्यात (Snail Control In Agriculture) बऱ्याच भागात परतीचा पाऊस पडल्यानंतर सुप्तावस्थेतील शंखी गोगलगायी (Snails) बाहेर पडताना आढळून येत आहेत, त्यामुळे फळबाग, कापूस यासारख्या पिकामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage By Snail) होऊ शकते. त्यामुळे शेतकर्‍यांनी या गोगलगायींचे वेळीच सामुहिकरीत्या एकात्मिक नियंत्रण (Integrated Control Of Snail) करावे असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलेला आहे. जाणून घेऊ या शंखी गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन.

शंखी गोगलगायीसाठी नियंत्रणात्मक उपाय योजना (Snail Control In Agriculture)

  • सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्या किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील.
  • गोगलगायी जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हा‍तमोजे व तोंडावर मास्क घालूनच करणे गरजेचे आहे.
  • शेतामध्ये किंवा बागेमध्ये 7 ते 8 मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकांच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी (Snail Control In Agriculture).
  • गोगलगायींना आकर्षित करण्यासाठी शेतात ठिकठिकाणी गोणपाट ओले करून त्यावर पत्ताकोबी अथवा पपईची पाने बारीक करून ठेवावीत, त्याला आकर्षित होऊन जमा झालेल्या गोगलगायींवर तंबाखूचा अर्क 5 लिटर (250 ग्रॅम तंबाखू भुकटी 7.5 लिटर पाण्यात उकळून 5 लिटर तयार झालेले द्रावण) + कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद द्रावण 5 लिटर (300 ग्रॅम कॉपर सल्फेट 5 लिटर पाण्यात) असे एकूण 10 लिटर द्रावण फवारावे, त्याच्या संपर्कात आल्याने गोगलगायी मरतात.
  • लहान शंखीच्या नियंत्रणासाठी (Snail Control In Agriculture) 10 टक्के मिठाची (100 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी) फवारणी फायदेशीर दिसून आली आहे.
  • बोर्डो मिश्रण (1 किलो मोरचूद + 1 किलो चुना 100 लिटर पाण्यात), कॉपर सल्फेट (300 ग्रॅम 10 लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात) इत्यादीच्या फवारण्या गोगलगाय नियंत्रणासाठी नोंदणीकृत नाहीत, परंतु गोगलगाय नियंत्रणासाठी किंवा त्यांना परावृत्त करण्यासाठी फळबागेत काही प्रमाणात परिणामकारक आहेत.
  • गोगलगायीच्या नियंत्रणासाठी (Snail Control In Agriculture) मेटाल्डिहाईड दाणेदार या गोगलगाय नाशकाचा (Snail Control Pesticide) वापर करावा.
  • कापसासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.
  • फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.
  • शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात. मेटाल्डिहाईडचा वापर जास्त तापमान व कमी आर्द्रता असते अशावेळी जास्त प्रभावी दिसून येतो.
  • मेटाल्डिहाईडला पर्याय म्हणून आयर्न फॉस्फेटचा वापर 2 किलो प्रति एकर या प्रमाणात अमिष म्हणून करता येतो. आयर्न फॉस्फेटचा वापर आर्द्रता जास्त असते अशावेळीही प्रभावी दिसून येतो. आयर्न फॉस्फेटच्या संपर्कात आल्यास गोगलगायी उपाशी राहून मरतात (Snail Control In Agriculture).
  • आयर्न फॉस्फेटचा वापर स्पिनोसॅड या कीटकनाशकासोबत (4 मिलि स्पिनोसॅड प्रति 2 किलो आयर्न फॉस्फेट) केल्यास जास्त परिणामकारक होतो. आयर्न फॉस्फेट पाळीव प्राणी व इतर प्राण्यांना सुरक्षित आहे.
  • वर सांगितल्याप्रमाणे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे.
  • या व्यतिरिक्त अंड्यांच्या टरफलाचा चुरा, कोरडी राख,तांब्याची पट्टी अथवा जाळी, बोरिक पावडर, यीस्ट पावडरचे द्रावण, साखरेचे द्रावण इ. चा वापर गोगलगायी व्यवस्थापनासाठी करता येतो.

आमिष तयार करण्याची पद्धती

दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक 25 ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण 50 किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. 10 ते 12 तास हे मिश्रण आंबविण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्झाम 25 टक्के 50 ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढीगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे.

महत्त्वाची नोट:

सदरील आमिष पासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे.

वरील गोगलगाय नाशक (Snail Control In Agriculture) अथवा अमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा.

अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या वरील प्रमाणे उपाय योजना सुरवातीपासूनच केल्यास गोगलगायीचे नियंत्रण (Snail Control In Agriculture) अधिक प्रभावीपणे होते.

error: Content is protected !!