Soil Testing : माती व पाणी परीक्षणाबद्दल A टू Z माहिती जाणून घ्या, आपण स्वतःला दवाखान्यात दाखवतो तर मग आपल्या धरणी मायला का नाही बरं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soil Testing) : माती व पाणी परिक्षण करणे हे आधुनिक शेतीचे पहिले पाऊल आहे. माती व पाणी परिक्षण केल्याने आपल्या शेतातील मातीची आणि पाण्याची गुणवत्ता आणि आरोग्य आपणास समजते. आपण आपल्याला काही झाले तर लगेच दवाखान्यात जाऊन चेकअप करतो. पण जी धरणी माय म्हणजेच जमीन/माती आपल्या कित्तेक पिढ्यांना जोपासतीये तिला आपण दवाखान्यात कधी दाखवणार? तीसुद्धा कित्तेक कीटकनाशके, रासायनिक खते यांचा सामना करून आजारी असू शकते. तिचा आजार कळला तरच आपण तिच्यावर आवश्यक तो उपचार करू शकतो. चला तर पाहुयात माती व पाणी परिक्षण बद्दल सविस्तर….

Table of Contents

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

आपल्या शेतातील माती व पाणी परीक्षण का करावे ? Soil Testing

 1. जमीनीची आणि पाण्याची गुणवत्ता समजण्यासाठी
 2. सिंचन व्यवस्थापन करण्याकरिता
 3. योग्यप्रकारे खते व्यवस्थापन करण्याकरिता
 4. जमीनीची योग्य गरज समजून घेण्यासाठी
 5. आपल्या जमिनीत कोणत्या घटकाची कमतरता आहे हे पाहण्यासाठी
 6. पाण्यात काही हानिकारक क्षार आहेत का हे तपासण्यासाठी

विशेष बाब –

 1. जमिनीतील अन्न द्रव्ये हे पाण्यामुळे पिकांना उपलब्ध होतात.
 2. अन्न द्रव्ये उपलब्धता प्रमाण हे पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
 3. जमीनीची आरोग्य पत्रिका माहीत असल्यास कमी खर्चात योग्य खते व्यवस्थापन करता येते.
 4. माती परीक्षण करण्यासाठी योग्य पद्धतीने मातीचा नमुना घेणे गरजेचे आहे कारण योग्य नमुना असेल तरच योग्य परिक्षण होइल.
 5. माती व पाणी परीक्षण केल्यामुळे खते आणि सिंचन व्यवस्थापन करण्यास मदत होते.

माती परीक्षण –

माती परीक्षण हा सुद्धा नियोजनबध्द शेती व्यवसायाचा एक भाग आहे. माती परीक्षण केल्याने शेतकरी बांधवांना आपल्या जमीनीची सत्य परिस्थिती समजते. यामुळे पुढील पीक नियोजन करणे, खत व्यवस्थापन करणे सोपे जाते. योग्य खत व्यवस्थापन केल्याने उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढते.

मातीचा नमुना कधी घ्यावा ?

मातीचा नमुना हा उन्हाळी हंगामात घ्यावा. कारण यावेळी जमीन रिकामी असते.
जमीन आरोग्य पत्रिकेनुसार पुढील खरीप हंगामाचे नियोजन करता येते.

नमुना गोळा करताना काय काळजी घ्यावी ?

 1. काडीकचरा, दगड, विटा, वाळू यांचा नमुना घेवू नये.
 2. दलदल, उकांडा, गोठा, विहीर, बांद याबाजूच्या मातीचा नमुना गोळा करू नये.
 3. नेहमी कोरडी माती परीक्षण करण्यासाठी पाठवावी.

मातीचा योग्यप्रकारे नमुना घेण्याची पद्धती –

 1. संपूर्ण शेताची पाहणी करून जमिनीच्या प्रकारानुसार त्याची विभागणी करावी.
 2. प्रत्येक विभागानुसार एक मातीचा नमुना प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठवावा.
 3. नमुना गोळा करताना तो नागमोडी आकारानुसार खड्डे गोळा करावा.
 4. सर्व खड्डे हे एकच सरळ रेषेत नको हे नेहमी लक्षात ठेवा.
 5. खुरपे किंवा कुदळ यांच्या साहाय्याने १५ ते २० सेमी खड्डा करून त्यातून मातीचा नमुना गोळा करावा.
 6. खड्डा हा “व्ही” या इंग्रजी आकारानुसार असावा.
 7. खड्डयातील पृष्ठभागापासून खाल पर्यंत माती गोळा करावी.
 8. वरील दिलेल्या पद्धतीनुसार १० ते १२ नमुने गोळा करून एका कागदी पेपरवर किंवा गोणीवर किंवा पोत्यावर एकत्र करावेत.
 9. एकत्र केलेल्या या मातीचे चार समान भाग करावेत. समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत.
 10. पुन्हा पुन्हा हीच कृती करावी. जोपर्यंत ५०० ते ६०० ग्रॅम माती शिल्लक राहत नाही तोपर्यंत असे करावे.
  ५०० ग्रॅम मातीचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावा.
 11. हा नमुना प्लॅस्टिक पिशवीत भरून त्यावर एका कागदावर सर्व माहिती लिहावी.

नमुनावर कोणती माहिती असावी ?

 1. शेतकऱ्याचे नाव
 2. संपर्क क्रमांक
 3. गाव, तालुका, जिल्हा
 4. जमिनीचा सर्व्ह नंबर
 5. मागील हंगामातील पिके
 6. माती गोळा केल्याची तारीख
 7. पुढील हंगामात घ्यावयाची पिके

किती खोलीवर नमुना गोळा करावा ?

 1. ही गोष्ट आपल्या पिकावर अवलंबून असते कारण प्रत्येक पिकाची मूळ संरचना, अन्नघटक शोषून घेण्याची पद्धत वेगवेगळी असते.
 2. जुन्या फळबागेत नमुना घेताना झाडांच्या खोडापासून १ ते १.५ फूट अंतरावर ३० सेमी खोलीचा नमुना गोळा करावा.
 3. कापूस, केळी, ऊस यापिकासाठी सुद्धा ३० सेमी खोलीवर नमुना घ्यावा.
 4. ज्वारी, भात, गहू, सोयाबीन, भुईमूग या पिकाकरिता १५ सेमी खोलीचा नमुना गोळा करावा.

मातीचा नमुना कुठे तपासतात ?

 1. सरकारी किंवा खासगी कृषी रसायन प्रयोगशाळा
 2. कृषी विद्यापीठ
 3. के व्ही के
 4. एफ पी ओ संचालित लॅब्स

पाणी परीक्षण –

आपल्या राज्यात कालवे, विहिरी, तलाव, बोयरवेल या विविध माध्यमातून शेती सिंचन केली जाते.
प्रत्येक पाण्याची गुणवत्ता वेगवेगळी असते. काही पाण्यात उपयुक्त तसेच हानिकारक क्षार असतात.
पाण्याची गुणवत्ता ही खडक व त्याची रचना, वातावरण यावर अवलंबून असते.
भूगर्भातील पाण्याचा झरा क्षारयुक्त खडकातून वाहत असल्यास अश्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असते.
असे पाणी पाण्याचा निचरा कमी असणाऱ्या जमिनीला वापरले असता वातावरणामुळे हे क्षार जमिनीच्या वरच्या थरात जमा होतात. आणि जमीन क्षारपट दिसू लागते.
पाण्याची गुणवत्ता सामू, विद्राव्य क्षारांचे प्रमाण, पिकाची विम्लता सहन करण्याची क्षमता, सोडियम स्थिरीकरण गुणोत्तर यावर अवलंबून असते.

पाणी तपासणी करिता नमुना कसा घ्यावा ?

 1. विहिरीचे पाणी नमुना घेताना विहिरीच्या मध्यभागी काही बादल्या पाणी उपसून टाकल्यावर घेणे.
 2. बोयरवेल पाणी नमुना घेताना एक ते दीड तास पंप सुरू ठेवल्यावर घेणे गरजेचे आहे.
 3. तलाव, नदी, ओढा अश्या वाहत्या पाण्यातून तपासण्यासाठी नमुना घेताना मध्यभागी बादलीने दोन तीनदा विसलून नंतर नमुना घ्यावा.

पाण्याचा नमुना घेताना काय काळजी घ्यावी ?

 1. पाण्याचा नमुना बाटलीत भरण्यापूर्वी बाटली त्याच पाण्याने दोन ते तीन वेळा चांगली धुवून घ्या.
 2. बाटली स्वच्छ करण्यासाठी साबनीचे पाणी किंवा निरमा असे काही वापरू नये.
 3. कीटकनाशके तणनाशके यांच्या रिकाम्या बाटल्या नमुना घेण्यासाठी वापरू नये.
 4. धातूपासून बनवलेली बाटली नमुना घेण्यासाठी वापरू नये.
 5. काचेची किंवा प्लॅस्टिक बाटली नमुना घेण्यासाठी वापरावी.
 6. नमुना घेतल्यावर २४ तासाच्या आत तो नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावा.

नमुना असलेल्या बाटलीवर खालील बाबी लिहिलेला कागद चिकटवा.

 1. शेतकऱ्याचे नाव आणि संपर्क क्रमांक
 2. गाव, तालुका, जिल्हा
 3. नमुना घेण्याचा स्त्रोत
 4. नमुना घेतल्याची तारीख
 5. मागील हंगामातील पीक
 6. रासायनिक खते कोणती वापरली

पाणी परिक्षण कुठे करून मिळते ?

 1. शासकीय पाणी परिक्षण प्रयोगशाळा
 2. कृषी विद्यापीठ
 3. कृषी विज्ञान केंद्र ( के व्ही के )
 4. खासगी कृषी प्रयोगशाळा
 5. शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत किंवा सहकारी तत्त्वावर आधारित लॅब
 6. कृषी महाविद्यालय येथील सॉईल अँड वॉटर टेस्ट लॅब

विशेष बाब –

जमिनीतील अन्न द्रव्ये हे पाण्यामुळे पिकांना उपलब्ध होतात.
अन्न द्रव्ये उपलब्धता प्रमाण हे पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
जमीनीची आरोग्य पत्रिका माहीत असल्यास कमी खर्चात योग्य खते व्यवस्थापन करता येते.
माती परीक्षण करण्यासाठी योग्य पद्धतीने मातीचा नमुना घेणे गरजेचे आहे कारण योग्य नमुना असेल तरच योग्य परिक्षण होइल.
माती व पाणी परीक्षण केल्यामुळे खते आणि सिंचन व्यवस्थापन करण्यास मदत होते.

सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की माती व पाणी परिक्षण नक्की करावे.

लेखक :-
श्री. सुदर्शन बाबासाहेब काकडे,
प्रोप्रायटर, सुदर्शन कृषी सेवा केंद्र,
नाका रोड, पैठण, जि. छ. संभाजीनगर
Mo. 9423152526

error: Content is protected !!