हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील कोतुळ येथील तरूण शेतकऱ्यास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Solar Pump) आधार ठरली आहे. त्यातून त्याच्या ऊस शेतीला संजीवनी मिळाली आहे. शुभम उपासनी असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. तो उच्च शिक्षित असून, त्याने बी.टेक (फूड टेक्नोलॉजी) तसेच एम.बी.ए (मॉर्केटिंग) केले आहे. मात्र, शिक्षणानंतर तो पूर्णपणे शेतीत रमला आहे. आज आपण त्याची शेतीतील यशोगाथा (Solar Pump) पाहणार आहोत.
अनियमित वीजपुरवठ्याची कटकट मिटली (Solar Pump Farmer Success Story)
शेतकरी शुभम उपासनी यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यापैकीच एक म्हणजे वीज पुरवठ्यातील अनियमितता (Solar Pump) ही समस्या होती. शुभम यांची एकूण 15 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. पाण्याची चोवीस तास मुबलकता, मात्र, वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने त्यांना नेहमीच पीक घेताना सिंचनाची अडचण येत होती. अशातच त्यांना ऑक्टोबर 2021 मध्ये राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सौर पंप योजनेचा लाभ मिळाला. आणि नियमित वेळेत पाणी मिळाल्याने ऊस शेतीला संजीवनी मिळाली आहे. त्यांनी आपल्या ऊसाच्या फडात बसविलेल्या साडेसात एचपीच्या सौर कृषी पंपामुळे 12 एकर शेती चांगलीच बहरली आहे.
खुल्या प्रवर्गातून 90 टक्के अनुदान
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सोलर पंप (Solar Pump) दिला जातो. या पंपाची खुल्या बाजारात साधारणतः चार ते साडेचार लाख रूपये किंमत आहे. शुभम उपासनी याने यासाठी 10 टक्के रक्कमेचा भरणा केला. त्यातून त्यांना सोलर (सौर) संच मिळाला. शक्ती सोलर कंपनीच्या ह्या संचाला साडेसात अश्वशक्तीचा पंप जोडण्यात आला आहे.
ऊस शेती होतीये फायद्याची
सोलर पंप बसण्यापूर्वी ऊस शेती करताना, उसाला पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. वीजेच्या अनियमितेमुळे ऊसाला पाणी देताना आठ-दहा दिवस विद्युतपुरवठा खंडित झाल्याने मोठे नुकसान व्हायचे. मात्र, आता 12 एकर ऊस शेताला सोलर पंपाद्वारे पाणी देणे सोयीचे, सहज साध्य होत आहे. त्यामुळे ऊसाची शेती करणे फायद्याचे ठरत आहे. असे शेतकरी शुभम उपासनी यांनी म्हटले आहे. सध्या सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विनाअडथळा हा पंप सुरू असतो. दररोज दिवसाला दीड एकर ऊसाच्या क्षेत्रात सिंचन होते. असेही त्यांनी नमूद केले आहे.
शेतीला जोडधंद्याचीही साथ
इतकेच नाही तर डांगी, जर्सी, गीर गायींचा गोठा शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून गायींचा गोठाही शुभमने उभा केला आहे. सध्या त्याच्याकडे डांगी, जर्सी व गीर गायी आहेत. यातून दूग्ध उत्पादनासोबतच शेणखत उपलब्ध होते. या शेणखताच्या माध्यमातून त्याला सेंद्रीय पध्दतीने शेती करणे शक्य होत आहे. भविष्यात आपण पॉली हाऊसच्या माध्यमातून पीक उत्पादन घेण्यावर भर देणार आहे. असेही शुभमने शेवटी म्हटले आहे.