Sonchafa Farming : सोनचाफा फुलशेती कशी केली जाते? जाणून घ्या रोपांची निवड ते विक्री कुठे करायची याबाबत सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Sonchafa Farming) सोनचाफा म्हणजे सौंदर्याची उपमासोनचाफा म्हणजे वासाचा महिमा !व्यावसायिक फुलशेतीत पुढे जाण्याची क्षमता असूनही अशा गुणी फुलाला व्यापारी लागवडीत महत्त्व दिले जात नाही. सोनचाफा (शास्त्रीय नाव “मायकेलिया चंपका’) म्हटले की नजरेसमोर येते ते पिवळेजर्द टपोरे सुगंधित असे फूल. त्याची उपमा कोणी चाफेकळी म्हणून नाकाबरोबर करेल, तर कोणी चाफा बोलेना चाफा चालेना म्हणून चक्क नाकावरच्या रागरुसव्याशी करेल.

पूर्वी कोणाच्या तरी परसदारी किंवा विस्तीर्ण देवालयाच्या बाजूला मोठे डेरेदार चाफ्याचे वृक्ष असत. असे मोठे वृक्ष पावसाळ्यात श्रावण महिन्यामध्ये फुलांनी बहरून येतात. त्याचा तो मंद सुगंध आला, की मन मोहून जाते. परंतु याच कालावधीमध्ये पाऊस बऱ्यापैकी असल्याने मोठ्या वृक्षावरील फुले काढणे हे काम फारच कष्टप्रद असते.

पावसामुळे झाडे ओली असल्यामुळे वर चढणे हे काम धोक्‍याचे असते. मग अशा झाडांवरील फुले काढून ती बाजारामध्ये विक्रीसाठी पाठविणे हे फारच दुर्मिळ.
इतर पारंपरिक शेतीबरोबरच आपल्या देशामध्ये फुलशेती बऱ्यापैकी होत आहे. त्यामध्ये गुलाब, जरबेरा, कार्नेशन, शेवंती, मोगरा, जाई-जुई, लिली यांसारख्या फुलांना फुलांच्या बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असून, आतापर्यंत काहीसे दुर्लक्षित व फुलशेतीमध्ये विशेष लागवड नसलेले सोनचाफ्याचे झाड. (Sonchafa Farming)

अशा दुर्मिळ सोनचाफ्यांची गुणवैशिष्ट्ये ओळखून त्याची कलमे करून अभिवृद्धी केल्यास अशा जातिवंत कलमांपासून आपणास फुलांचे उत्पादन घेणे शक्‍य आहे. कलमांची लागवड केली असता अशा झाडांपासून लवकर व झाडांची कमी उंची ठेवून आपणास फुलांचे उत्पादन घेता येते. यापासून आपणास फुले विकून पैसे तर मिळतातच, परंतु चाफ्याच्या सुगंधाने मन उल्हसित राहून ताणतणावांपासून मुक्त राहण्याचा आनंद मिळतो तो वेगळाच.

कलमे करून अभिवृद्धी

चाफ्याचे कलम जातिवंत मातृवृक्षावर भेट कलम पद्धतीने केले जाते. यासाठी मूळरोप चाफ्याचेच वापरले जाते.अशी कलमे झाडावर तयार होण्यास 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागतो. ही कलमे झाडावर तयार झाली, की पावसाळ्याच्या सुरवातीस झाडावरून उतरवून ती नर्सरीमध्ये मोठ्या पॉलिथिन बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये जोपासना केली जाते. साधारणतः एक वर्षानंतर ही कलमे लागवडीस योग्य होतात. अशी कलमे लावताना त्याची पूर्ण माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

फुलशेतीसाठी सोनचाफा लावताना त्याची निवड करणे हे फार महत्त्वाचे आहे. सोनचाफ्यामध्ये अनेक प्रकार असून, त्यांना फुले येण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. यामध्ये प्रकारांबरोबरच फुलांचा रंगही वेगवेगळा असतो. त्यामुळे फुलांच्या बाजारामध्ये दराचा ग्राहकाचा व टिकाऊपणाचा विचार करून सोनचाफ्याची लागवड करावी. यासाठी गडद पिवळा व गडद केशरी किंवा सिमाचल केशरी यांची कलमे लावावीत.

सर्वच चाफ्याच्या झाडांची पाने जवळपास एकसारखीच असल्याने त्यांना जातीनुसार ओळखण्याची सुविधा नाही. त्यामुळे कलमे खरेदी करताना मातृवृक्ष बाग पाहून त्यावरील फुले पाहून खात्रीच्या नर्सरीमधून कलमे खरेदी करावी. अन्यथा कलमे लावून मोठी झाल्यावर फार मोठे आर्थिक नुकसान होते.

जमीन
सोनचाफा लागवड करताना पाण्याचा निचरा उत्तमप्रकारे होणारी जमीन हवी. तसेच सूर्यप्रकाश भरपूर हवा. इतर झाडांची सावली असल्यास सूर्यप्रकाशाकरिता ही झाडे उंच वाढतात. नंतर फुले काढणे अवघड होते. पाण्याचा निचरा होणारी कोणतीही जमीन, कोणतेही हवामान या झाडांना मानवते. या झाडाचा नैसर्गिक आढळ उष्ण दमट हवामानात असतो. त्यामुळे जास्त पाऊस व आर्द्रतेच्या परिसरात याची वाढ चांगली होते.

लागवडीचा काळ
पाण्याची बारमाही सोय असल्यास कोणत्याही हंगामामध्ये लागवड करता येते. कलम लावताना खड्डा 60 सेंमी द 60 सेंमी. द 60 सेंमी, असा खणून त्यामध्ये कुजलेले कंपोस्ट खत, गांडूळ खत व शेणखताने अर्धा भरावा. दोन झाडांमधील अंतर 3 मीटर व दोन ओळींमधील अंतर 3 मीटर ठेवावे. कलमाचा डबा अथवा पॉलिथिन बॅग हलकेच काढून मुळांना इजा न करता कलम लावावे. कलमाचा जोड असलेला भाग जमिनीच्या वर ठेवावा, तसेच जोडाजवळ मूळरोपाला येणारे फुटवे वेळोवेळी काढावेत. 3 द 3 मीटर याप्रमाणे लागवड केली असता एका आरला 10 झाडे बसतात. एकरी 400 व हेक्‍टरी 1000 कलमांची लागवड करता येते.

खते व पाणी व्यवस्थापन
झाडांना वेळोवेळी शेण खत, गांडूळ खत व स्टेरामिल ही खते वाढीनुसार द्यावीत. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. पावसाळ्यात कलमे लावलेल्या जागेमध्ये कोठेही पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

एक वर्षानंतर या कलमांना कळ्या येऊन फुले येऊ लागतात. सुरवातीस हे प्रमाण कमी जास्त असते. दोन वर्षांनंतर झाडांची वाढ जोमदार झाल्यावर प्रत्येक झाडाला सरासरी 15 ते 20 फुले येतातच. फुले येण्याचा कमी जास्त काळ वगळता वर्षातून 180 दिवस फुले मिळतात. तीन वर्षानंतर झाडे चांगलीच जोमाने वाढून फुलांचे प्रमाण वाढते. झाडे अस्ताव्यस्त वाढून दाट होऊ नये यासाठी त्यांची छाटणी करून झाडे लहान ठेवता येतात. यामुळे फुले काढणे सोयीचे होते. (Sonchafa Farming)

फुलांची काढणी
सकाळी लवकर फुले काढून ती जवळच्या बाजारामध्ये 3-4 तासातच पाठवावी. उन्हाने व धक्‍क्‍याने हे नाजूक फूल कोमेजते. यामुळे काढणी व विक्री या गोष्टी त्वरेने होणे महत्त्वाचे आहे. अशा फुलांना व्यापाऱ्यांकडून शेकडा 30 ते 40 रुपये दर मिळतो. सणासुदीच्या काळामध्ये यापेक्षा जास्त दर मिळतो. मेहनत व मशागतीचा खर्च वजा जाता हेक्‍टरी वार्षिक एक लाख रुपये तरी उत्पादन मिळते.

ही फुले दादर, पुणे, स्थानिक फूलबाजारात विकली जातात. सोनचाफ्याच्या झाडांवर आजपर्यंत कोणतीही रोगराई नाही, तसेच चाफ्याच्या झाडांबाबत साप येतो वगैरेसारखे गैरसमज आहेत. चाफ्यासारख्या दुर्मिळ वृक्षाचे जतन व्हावे हाच यामागे हेतू आहे

error: Content is protected !!