हेलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात हुरड्याची (Sorghum Hurda) मागणी वाढत आहे. याचे कारण अनेक ठिकाणी कृषी पर्यटनामध्ये हुरडा पार्टीचे आयोजन केले जाते. हुरड्यासाठी असणारे ज्वारीचे वाण वेगळे असतात. ज्वारी या पिकाचा वापर अन्नधान्य व जनावरांसाठी कडबा म्हणून होतो. ज्वारीमध्ये खनिज व तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. तसेच त्यातील असणाऱ्या स्टार्चचे विघटन हळूवार होत असल्याने मधुमेह (Diabetes) व स्थुलता असणाऱ्या व्यक्तींसाठी ज्वारीचा आहारात उपयोग करणे फायदेशीर आहे. ज्वारीच्या हुरडा ‘लो कॅलरीज आणि पौष्टिक डायनिंग टेबलफूड’ म्हणून लोकप्रिय होत आहे. हुरड्यासाठी ज्वारीची लागवड केल्यास जनावरांसाठी हिरवा चारा सुध्दा मिळतो.
हुरड्यासाठी ज्वारीची लागवड रब्बी हंगामात तसेच उन्हाळी हंगामतही केली जाते. प्रतिएकरी 4 कि.ग्रॅ. बियाणे आवश्यक असते. हुरड्यासाठी (Sorghum Hurda) स्थानिक वाणांची लागवड करायची असल्यास 4 ग्रॅम 300 मेश गंधकाची बीजप्रक्रिया करावी. लागवड करताना दोन ओळीतील अंतर 45 सें.मी. व दोन ताटातील अंतर 15 सें.मी. असावे.
शिफारसीत केलेले सुधारीत हुरडा वाण (Sorghum Hurda)
परभणी वसंत : हा वाण परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने सन 2021 मध्ये प्रसारित केला आहे. या वाणाचा कालावधी 95 दिवसांचा असतो. हा वाण खोडमाशी, खोडकीड व खडखड्या रोगास सहनशील असल्याचे आढळून आले आहे. हा वाण मराठवाडा विभागासाठी प्रसारित करण्यात आला आहे. हुरडा (हिरवा व भाजलेला) खाण्यास गोड व चवदार असून दाण्याची व कडब्याची प्रत उत्तम आहे. प्रतिहेक्टरी 34 क्विंटल हुरड्याचे उत्पादन मिळते.
फुले मधुर (आरएसएसजीव्ही-46) : या वाणाचा हुरडा रुचकर व गोड लागतो. हुरड्याचे दाणे भोंडातून सहज सुटतात. या वाणाचा हुरडा 95 ते 100 दिवसांत तयार होतो. हुरड्याचे प्रतिहेक्टर 25 ते 30 क्विंटल तर कडब्याचे 55 ते 60 क्विंटल उत्पादन मिळते.
एसजीएस-8-4 : या वाणाचा हुरडा चवदार लागतो. हुरड्याचे दाणे सहज सुटतात. या वाणाच्या हुरड्याचे दाणे हे टपोरे असतात. प्रति हेक्टरी हुरड्याचे 15 ते 16 क्विंटल तर कडब्याचे 70 ते 75 क्विंटल उत्पादन या वाणापासून मिळते.
फुले उत्तरा : या वाणाच्या हुरड्याच्या कणसातून सहज दाणे सुटतात. हुरडा तयार होण्यासाठी 90 ते 100 दिवसांचा कालावधी लागतो. या वाणापासून हुरड्याचे प्रतिहेक्टरी 20 ते 25 क्विंटल तर कडब्याचे 55 ते 60 क्विंटल उत्पादन मिळते.
इतर स्थानिक वाण
सुरती, गुळभेंडी, कुची कुची, काळी दगडी