सद्य हवामान स्थितीत सोयाबीन आणि भाजीपाला पिकांची अशी घ्या काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 25 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, लातूर जिल्हयात तर दिनांक 27 ऑगस्ट रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 28 ऑगस्ट रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन

सोयाबीन पिक सध्या फुलोरा ते शेंगा धरणे या अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास सोयाबीन पिकास संरक्षित पाणी द्यावे.

पिवळा मोझॅक : सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त झाडे तात्काळ उपटून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकर 15-20 पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.60% + लँबडा सायहॅलोथ्रीन 9.50% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लूथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

पाने खाणारी आळी : सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळ्या (स्पोडोप्टेरा, उंटअळी, केसाळअळी, घाटेअळी) यांच्या व्यवस्थापनासाठी फ्लुबेंडामाईड 39.35% 3 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

करपा : सोयाबीन पिकावरील शेंगा करपाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी फुलोरा अवस्थेतील सोयाबीन पिकावर टेब्यूकोनॅझोल 10% + सल्फर 65% 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मिरची पिकावरील मर (ॲन्थ्रॅकनोझ) व्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!