Success Story : मानलं गड्या… ऑनलाईन हुरडा विक्री; मराठवाड्यातील तरुणाचा भन्नाट व्यवसाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या शिक्षणाचा वापर सामाजिक, व्यावसायिक जीवनामध्ये कौशल्याने (Success Story) करणे ही कला फार कमी जणांना अवगत असते. त्यामुळे समाजात वावरताना किंवा एखादा व्यवसायात पदार्पण करत असताना, आपल्या शिक्षणाचा वापर करता येणे महत्त्वाचे असते. याच तत्वाला अनुसरून मराठवाड्यातील चार तरूणांनी शेतीचा आसरा घेत, पुण्यात हुरडा विक्रीचा एक भन्नाट व्यवसाय (Success Story) सुरू केला आहे. हा व्यवसाय ऐकून तुम्हीही म्हणाल मानलं गड्या…

कशी सुचली कल्पना?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अमित मरकड (Success Story) पुण्यात आला. मात्र अपेक्षित जम बसत नसल्याचे पाहून त्याला आपण शेतकरी असल्याची जाणीव झाली. तिथूनच हुरडा विक्रीच्या कल्पनेचा जन्म झाला. यासाठी प्रथम अमित गावाकडून हुरडा बनवून आणायचा आणि पुण्यात मित्र मंडळी किंवा ओळखीच्या लोकांना तो विकायचा. बघता बघता जम बसू लागल्याचे पाहताच अमितने समाज माध्यमांच्या मदतीने जाहिरात करत हुरडा विक्री सुरु केली. एकट्याला व्यवसायात लक्ष देता येणे अवघड झाल्याने त्याने ऋषिकेश नवले, श्रीकृष्ण थेटे आणि राहुल जाधव या मित्रांना सोबत घेतले. सध्या अमित पुण्यात होणाऱ्या फेस्टिवल, प्रदर्शनामध्ये स्टॉल लावून हुरडा विक्री करत आहे. याशिवाय दररोज 50 किलोपेक्षा जास्त हुरडा विक्री पुण्यात ऑनलाईन पद्धतीने विक्री करत असल्याचे तो सांगतो. अमितच्या या कल्पकतेमुळे त्याच्या गावातील शेतकऱ्यांनाही चांगले पैसे मिळत असून, तो ही मित्रांच्या मदतीने चांगली कमाई करत आहे.

‘मराठवाडा हुरडा कंपनी’ची स्थापना (Success Story Of Amit Markad)

हुरडा विक्रीमध्ये चांगला जम बसल्याने अमितने आपल्या व्यवसायाला ओळख मिळावी, म्हणून ‘मराठवाडा हुरडा कंपनी’ असे नाव दिले आहे. मराठवाड्यातील असल्याने आपल्या भागाचे नाव प्रकर्षाने झळकावे या हेतूने त्याने हे नाव दिल्याचे तो सांगतो. अमित या कंपनीच्या माध्यमातून हुरड्या सोबतच केशर, हापूस आंब्याची विक्री देखील करत आहेत. व्यवसायातील त्याचे चारही सोबती मूळ शेतकरी असून, त्यातील एक जण कोकणातील हापूस आंब्याचा शेतकरी आहे. त्यामुळे त्यांनी हुरडा आणि हापूस अशी एकत्रित विक्री सुरु केली आहे.

समाज माध्यमांचा प्रभावी वापर

आजकाल सोशल मीडियाचा आधार घेत व्यवसाय वृद्धी करणे सोपे झाले आहे. अमित आणि त्याच्या मित्रांनीही याच संकल्पनेचा आधार घेत आपला हुरडा आणि हापूस आंबा पुण्याच्या अनेक भागांमध्ये पोहचवणे सुरू केले आहे. यासाठी त्यांनी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल माध्यमांचा प्रभावी वापर केला आहे. अमित आणि त्याचे मित्र समाज माध्यमांद्वारे ऑर्डर घेतात. आणि एका खासगी कंपनीचा आधार घेत ते ग्राहकांना घरपोच हुरडा पाठवतात. इतकेच नाही तर ‘मराठवाडा हुरडा कंपनी’ने हुरडा खराब निघाल्यास 10 वेळा बदलून देण्याची शाश्वती दिली आहे. त्यामुळे हा हुरडा ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. समाज माध्यमातून दररोज जवळपास 50 किलो हुरड्याची विक्री होत आहे.

किती मिळतोय नफा?

हुरडा म्हटले की त्यासाठी एक निश्चित कालावधी (Success Story) आहे. कारण तो केवळ नोव्हेंबर ते जानेवारी या हिवाळ्याच्या कालावधीतच विक्री केला जाऊ शकतो. मात्र अमित आणि त्याचे मित्र याच दिवसांमध्ये मोठ्या कष्टाने पुण्यात होणाऱ्या प्रदर्शन, महोत्सवामध्ये स्टॉल लावतात. तसेच नियमित ऑनलाईन विक्री करतात. याद्वारे त्यांना तीन महिन्यात सर्व खर्च वजा जाता तीन लाखांचा नफा मिळतो. आणि मग उन्हाळ्यात याच पद्धतीने आंबा विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे वेगळे असते. असे अमित सांगतो. नोकरीतून हवे तसे पैसे मिळत नसल्याने आपण हुरडा विक्रीचा मार्ग निवडल्याचे अमित सांगतो.

error: Content is protected !!