Success Story : मत्स्यपालनातून करतोय 2.5 कोटींची उलाढाल; कधीकाळी होता अपयशाचा धनी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी मत्स्यशेती (Success Story) कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून समोर येत आहे. त्यातच राज्यात मागील काही वर्षांपासून शेततळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मत्स्यशेतीला (Success Story) विशेष महत्व प्राप्त झाले असून, शेतकरी शेती सोबतच मत्स्यपालनातून मोठी कमाई करत आहे. अशाच एका व्हिएतनामी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत.

हाय डेंसिटी कल्चर तंत्रज्ञानाचा वापर (Success Story Of Fish Farming)

उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील शेतकरी मोहम्मद आसिफ सिद्दीकी हे मत्स्यशेतीसाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. 2015 पासून ते मत्स्यशेती करत असून, त्यांनी त्यासाठी हाय डेंसिटी कल्चर या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हाय डेंसिटी कल्चर म्हणजे काय तर मोकळ्या जागेत अनेक नैसर्गिक तलावांच्या माध्यमातून ते मत्स्यशेती करत आहे. ज्याद्वारे त्यांची कंपनी आज वार्षिक 2.5 कोटींची उलाढाल करत आहे.

अपयशातून यशाकडे वाटचाल

आसिफ यांना शेतीबाबत कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे ते आपले नशीब अन्य क्षेत्रात आजमावत होते. त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःला आजमावून बघितले. मात्र त्यात त्यांना अपयशाचे धनी व्हावे लागले. आसिफ यांचे वडील शेती करत होते. त्यामुळे त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी केळी लागवड केळी केली. मात्र तिथेही त्यांना निराशाच पदरी पडली. त्यामुळे मित्रांच्या सल्ल्याने विचारांती ते मत्स्यशेतीकडे वळाले आणि त्यातून ते सध्या वार्षिक मोठी उलाढाल करत आहे. आपल्या मित्राची यशस्वी मत्स्यशेती पाहून त्यांनी मनोमन निर्धार करत मत्स्यशेतीची वाट धरली. 2015 मध्ये आसिफ यांनी एका एकरात खुल्या पद्धतीने पंगेसियस माश्यांच्या प्रजातींची नर्सरी तयार केली. मत्स्यशेती त्यांच्यासाठी नवीन होती. त्याबाबत त्यांना काहीही माहिती नव्हते. त्यामुळे त्यांनी सरकारी पातळीवर माहिती मिळवत प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणात ते नवनवीन तंत्रज्ञानासोबत अवगत झाले.

पंगेसियस प्रजातीची निवड

आसिफ सांगतात, एक एकरात दीड लाख रुपये खर्च करून त्यांनी खुले तलाव तयार करून मत्स्यपालन सुरू केले. केवळ सहा ते सात महिन्यात त्यांना 62 टन मत्स्य उत्पादन मिळाले. ज्यामुळे मिळालेल्या उत्पन्नातून त्यांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळाली. आलेल्या उत्पन्नातून त्यांनी आपल्या सहा एकर शेतीला तळ्यांचे स्वरूप दिले. त्यांनी आपल्या व्यवसाय विस्तारासाठी पश्चिम बंगाल येथून पंगेसियस प्रजातींच्या माशांचे बीज खरेदी केले. प्रति 3 रुपये दराने खरेदी केलेले हे बीज वापरून आसिफ यांनी सहा एकरात आपला मत्स्य व्यवसाय विस्तारला आहे. ज्यातून ते सध्या 250 टन मत्स्य उत्पादन मिळवत आहेत. आसपासच्या 8 जिल्ह्यांना ते माशांचा पुरवठा करत आहे.

व्हिएतनामी तंत्रज्ञानाचा वापर

आसिफ यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून 6 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यांच्या या व्यवसायातून 50 स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ते सांगतात, “यापूर्वी आंध्रप्रदेशातून सर्वाधिक मासे युपीमध्ये येत होते. मात्र आपण राज्य सरकारच्या मदतीने हाय डेंसिटी कल्चर या व्हिएतनामी पद्धतीचे प्रशिक्षण घेतले. सध्या आपण वार्षिक 2.5 कोटींची उलाढाल करत आहोत.” ज्यामुळे सामान्य मत्स्यपालनाचा तुलनेत आपल्याला 5 पटीने अधिक नफा मिळत आहे. मत्स्यपालनासाठी जुलै-ऑगस्ट महिना सर्वात चांगला असून, आपण बीजउत्पादन करताना विशेष काळजी घेतो. तळ्यांमध्ये मत्स्य पिल्लांना ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून आपण कृत्रिमरित्या पुरवठा करत असल्याचेही ते आवर्जून सांगतात.

error: Content is protected !!