हॅलो कृषी ऑनलाईन : तंत्रज्ञानाआधारीत शेती करून आपले नशीब बदलले जाऊ शकते. याचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील शेतकरी गौतम राठोड यांना आला आहे. गौतम यांनी काश्मीरमध्ये उत्पादित होणाऱ्या केशर पिकाची (Saffron Farming) लागवड पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे यशस्वी (Success Story) करून दाखवली आहे. यासाठी त्यांनी एरोफोनीक तंत्रज्ञानाचा वापर केला असून, यातून ते मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे.
प्रथम गॅरेजची सुरुवात- Success Story
B. Com चे शिक्षण घेतल्यानंतर गौतम राठोड यांनी प्रथम तळेगाव येथे आपले गॅरेज सुरू केले. सुरुवातीला गॅरेज चांगले चालत असल्याने त्यांचे आयुष्यही सुखकर झाले होते. मात्र त्यांच्या आयुष्यातील ही सुखाची लहर जास्त दिवस टिकू शकली नाही. कारण गौतम यांना कॅन्सर या रोगाने ग्रासले असल्याचे निदान झाले होते. त्यांच्या उजव्या किडनीमध्ये असलेल्या रक्ताचा ट्युमर दिवसेंदिवस वाढत होता. केवळ ट्युमर काढणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी गौतम यांच्या उजव्या बाजूच्या किडनीसहित तो ट्युमर शरीरापासून वेगळा केला.
कॅन्सर आणि त्यातच त्यांची उजवी किडनी काढण्यात आल्यामुळे गौतम आता अजवड वस्तू उचलण्याचे काम करू शकत नव्हते. मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या एका मित्राने त्यांना केशर शेतीचा व्हिडीओ पाठवला होता. या एका व्हिडिओने त्यांचे अवघे आयुष्य बदलून गेले. त्यांनी एरोफोनीक तंत्रज्ञानाचा वापर करून केशर शेती करण्याचा निर्णय घेतला आणि काश्मीर मध्ये उत्पादित होणाऱ्या केशर सारखाच गुणवत्तापूर्ण केशर पुणे येथे उत्पादित करणे सुरू केले.
गौतम राठोड सांगतात की, केशर शेतीबाबतचा एक व्हिडिओ पाहून आपणही केशर शेती करू शकतो असे मनात आले. त्यासाठी विविध मार्गाने केशर शेतीबाबत माहिती मिळवल्याचे ते सांगतात. केशर शेतीच्या कार्यशाळांना उपस्थित राहून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या छताच्या बंद खोलीमध्ये केशरचे उत्पादन घेण्याचा (Success Story) निर्णय घेतला. यासाठी त्यांनी 10 बाय 12 फूट जागेची निवड करत व्हर्टिकल फार्मिंग करण्यासाठी योग्य ती परिस्थिती निर्माण केली. याशिवाय त्यांनी केशरचे बियाणे काश्मीर येथून मागवले. तीन महिन्यात योग्य ती काळजी घेऊन त्यांनी केशरचे उत्पादन घेतले आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या गुणवत्तापूर्ण केशर पिकाची कापणी करण्यात आली. बाजारात सध्या 12 ते 13 मीमी लांब असलेल्या केशरची किंमत 800 रुपये प्रति ग्राम इतकी आहे. याशिवाय बारीक तुकडे असलेला केशर हा 400 रुपये प्रति ग्रॅम दराने विकला जातो. असेही गौतम राठोड सांगतात. अशाप्रकारे कॅन्सरग्रस्त असूनही गौतम राठोड यांनी केशर शेतीचा यशस्वी प्रयोग (Success Story) करून दाखवला.