हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पालवेवाडी येथील संतोष शेषराव पालवे (Success Story) यांच्या शेतकरी कुटुंबाने फळबागेसारख्या पूरक उद्योगात प्रचंड मेहनत घेऊन सेंद्रिय शेतीच्या जोरावर यावर्षी दहा टन केशर आंबा अमेरिकेमध्ये निर्यात केला आहे. तेराशे आंब्याच्या झाडांमधून त्यांना वीस लाख रुपयांचे उत्पन्नही मिळाले आहे. ज्यामुळे सध्या त्यांच्या या यशस्वी आंबा शेतीची (Success Story) जोरदार चर्चा सुरु आहे.
नोकरीला ठोकला रामराम (Success Story Of Mango Farming)
शेतकरी शेषराव पालवे यांनी दहा वर्षांपूर्वी अत्यंत हलक्या, नापीक असणाऱ्या जमिनीत साडेआठ एकर क्षेत्रावर (Success Story) फळबाग लावली. यात गावरान, केशर, हापूस, लंगडा, राजापुरी, वनराज, सदाबहार, आम्रपाली, तोतापुरी अशा विविध प्रकारच्या तेराशे आंब्याची झाडे लावली. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी शेततळे उभारले. सर्व जमिनीत ठिबक सिंचन पद्धती उभारली. विशेष म्हणजे शेषराव पालवे यांचा मुलगा संतोष पालवे हे उच्चशिक्षित असूनही पूर्णवेळ शेतीमध्ये लक्ष देत आहेत. संतोष हे बी.एड.चे शिक्षण घेऊन खासगी संस्थेत पैठणला शिक्षकाची नोकरी करत होते. मात्र, सध्या त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ शेतीसाठी वाहून घेतले आहे.
किती मिळाले उत्पन्न?
कोरोना काळात अनेकांना आर्थिक फटका बसला; पण पालवे कुटुंबाची खरी ओळख त्याच काळात तालुक्याला झाली. घरातील सर्व नऊ व्यक्ती पहाटे चारपासूनच शेतात काम करतात. यंदा दहा टन केशर आंबा अमेरिकेत निर्यात झाला. छत्रपती संभाजीनगर येथील व्यापाऱ्यांच्या मदतीने त्यांनी 20 लाख रुपयांचा दहा टन केशर आंबा निर्यात केला आहे. असे शेतकरी संतोष पालवे सांगतात.
01 झाडापासून 800 फळे
शेतात सध्या नव्याने एक हजार आंबा झाडे, मोसंबीची सातशे, नारळ दोनशे, जांभूळ एकशे पन्नास झाडे लावली. यंदा टंचाई असल्याने टँकरने विकत पाणी घेऊन झाडांचे संपूर्ण कुटुंबीयांकडून संगोपन होते. एका झाडापासून साधारण 800 आंब्याची फळे निघतात, असेही पालवे यांनी सांगितले आहे. फळबागेतील विविध कामांसाठी गरजेनुसार कामगार लावले जातात. दोन महिन्यांचा आंबा हंगाम अत्यंत धावपळीचा असतो. काही तरी वेगळे करण्याची तयारी ठेवत पालवे कुटुंबाने धाडशी पाऊल उचलत फळबाग लावण्याचा निर्णय घेतला. आता बाजारपेठेचा अभ्यास करीत ते आता स्वतः निर्यातदार होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ज्यात त्यांना यशही मिळत आहे.