हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान बदलामुळे सध्या शेती (Success Story) करणे तितकेसे सोपे नसते. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. मात्र काही शेतकरी हे याला अपवाद असतात. ते अशा खडतर परिस्थितीतही आपल्या कल्पकतेमुळे आणि नावीन्यतेमुळे यशाचा मार्ग सुखकर करतात. दुष्काळाच्या परिस्थितीतही धीराने खरबूज शेती करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) आज आपण पाहणार आहोत. ज्यांनी नियोजनबद्धरित्या खरबूज लागवडीतून काही महिन्यांमध्ये लाखोंचे उत्पन्न घेतले आहे.
कोणती जात निवडली? (Success Story Of Muskmelon Farming)
संतोष गवळी असे या खरबूज शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे (Success Story) नाव असून, ते लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील रहिवासी आहेत. संतोष यांनी आपल्या एक एकर शेतामध्ये ही खरबूज लागवड केली असून, ती सध्या तोडणीला आली आहेत. संतोष यांनी खरबूज लागवडीसाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब केला असून, त्यांनी सर्वप्रथम एक एकर रानाची चांगली मशागत केली. त्यांनतर बेड पाडत, त्यावर मल्चिंग, ठिबक अशी व्यवस्था केली. ज्यामुळे त्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यास मदत झाली. संतोष यांनी खरबूज शेतीसाठी ‘बॉबी’ या जातीची निवड केली. जवळपास एक एकरमध्ये त्यांनी 6 हजार रोपांची लागवड केली आहे.
उत्पन्न किती?
सध्या शेतकरी संतोष गवळी यांच्या एक एकरभर रानात मोठ्या प्रमाणात खरबूज लगडलेले असून, त्यांची काढणी सुरु झाली आहे. त्यांना आतापर्यंत खरबूज लागवडीसाठी एक एकर रानासाठी एकूण एक लाख रुपयांचा खर्च आला आहे. यात मल्चिंग, ठिबक, खते, औषध फवारणी आणि इतर खर्चाचा समावेश आहे, असे ते सांगतात. सध्यस्थितीमध्ये खरबुजाला बाजारात 40 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. सध्या मिळणारा दर आणि एकूण एकरातील उत्पादन पाहता आपल्याला पुढील काही महिन्यात खर्च वजा जाता कमीत कमी 6 ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी संतोष गवळी सांगतात.
मिरचीतूनही नफा
शेतकरी संतोष गवळी यांच्याकडे आपली वडिलोपार्जित 4 एकर शेती आहे. जमिनीसाठी त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. शेतात विहीर आणि बोअरवेल घेतले असून, त्यांना चांगले पाणी देखील असते. याच पाण्याच्या जोरावर त्यांनी मागील वर्षी आपल्या एक एकर रानात मिरचीची लागवड केली होती. त्यातून त्यांना एकरात केवळ चार महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास 4 लाखांचा निव्वळ नफा मिळाला होता. यावर्षी त्यांनी खरबूज लागवडीचा प्रयोग केला असून, त्यात त्यांना यश देखील आले आहे. ते आपल्या उर्वरित जमिनीमध्ये ऊस आणि ज्वारी पिके घेतात.