Success Story : 20 एकरात आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड; शेतकरी मिळवतोय लाखोंचे उत्पन्न!

0
2
Success Story Of Orchard Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हल्लीच्या काळात अनेक जण उच्च शिक्षणानंतर शेती वाट धरताना (Success Story) दिसून येत आहे. तर काही जण चांगल्या पगाराची नोकरी सोडून, शेतीमध्ये रमताना दिसून येत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेऊन चार वर्ष कोल्हापूरात नोकरीही केली. मात्र शेतीची आवड असल्याने, नोकरी सोडून गावी आले व शेतीच्या कामामध्ये स्वतःला व्यस्त केले. विशेष म्हणजे आज त्यांनी शेतीमध्ये आपला एक वेगळा ठसा (Success Story) उमटवला आहे.

वीस एकरात फुलवली फळबाग (Success Story Of Orchard Farming)

विश्वास जोशी असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते रत्नागिरी जिल्ह्यातील नेवरे गावचे रहिवासी आहे. त्यांची स्वतःची वीस एकर जमिनी असून, त्यात त्यांनी ६०० हापूस, ४०० काजू (वेंगुर्ला ४), २० नारळ, १,००० सुपारी झाडांची लागवड केली आहे. याशिवाय नारळ, सुपारीमध्ये आंतरलागवड म्हणून काळीमिरी लागवड केली आहे. विश्वास यांचा मुलगा देखील एमएस्सी (हॉर्टीक्लचर) पदवीधर असून, तो नोकरीच्या मागे न लागता त्यांना शेतीमध्ये मदत करतो.

सेंद्रिय उत्पादनावर अधिक भर

फळशेतीला जोड म्हणून त्यांनी दूग्धोत्पादन व्यवसाय सुरू केला आहे. दूध विक्रीबरोबरच शेण व गोमूत्रापासून शेणखत, जीवामृत तयार करून त्याचा वापर, ते सेंद्रिय शेतीसाठी करत आहेत. त्यामुळे उत्पादन व उत्पादकता दोन्ही बाबतीत त्यांना यश मिळाले आहे. फळ बागेतील पालापाचोळा, गायीचे शेण, गोमूत्र एकत्र करून त्यापासून ते सेंद्रिय खत निर्मिती करत असून, त्याचा वापर शेतीसाठी करत आहेत. आवश्यकता भासल्यास अगदी अल्प प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. मात्र, सेंद्रिय उत्पादनावर त्यांचा अधिक भर असल्याचे विश्वास जोशी सांगतात.

यांत्रिक अवजारांचा वापर

शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे, ते यांत्रिक अवजाराचा अधिक वापर करतात. ज्यामुळे वेळ, श्रम, पैशाची बचत होत आहे. त्यांनी कोकण कृषी विद्यापीठ प्रमाणित सुपारी सोलण्याचे यंत्र विकत घेतले आहे. त्यामुळे दरवर्षी टन, दीड टन सुपारी सोलणे सुलभ होत आहे, सुपारीवर त्यांनी काळीमिरीचे वेल सोडले आहेत. मिरी तयार झालेनंतर उकळणे, वाळविणे या प्रक्रिया न करता, हिरव्या मिरीची विक्री करत आहेत. नवी मुंबई येथील वाशी बाजारपेठेत ओल्या काळ्या मिरीला दर तर चांगला मिळतोच, शिवाय विक्री सुलभ होते.]

किती मिळतेय उत्पन्न?

शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन बघितले तर ती नक्कीच परवडते. हाच दृष्टीकोन ठेऊन आपण शेती करत आहे. ज्यामुळे आपल्याला हापूस आंबा, काजू, नारळ, सुपारी या प्रमुख फळ पिकांमधुन देखील वार्षिक लाखोंचे उत्पन्न मिळत असल्याचे शेतकरी विश्वास जोशी यांनी सांगितले आहे. याशिवाय यावर्षी जोशी यांनी आंतरपिक असलेल्या हिरवी काळीमिरी विक्रीतून एक लाखाचे उत्पन्न मिळवले आहे.