हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यावर्षी अपेक्षेपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. मात्र याउलट कधी कधी राज्यात पूरस्थिती (Success Story) निर्माण होते. अशावेळी काही शेतकऱ्यांची शेती ही नदी, ओढा यांच्या बाजूला असल्यास त्यात नेहमी पाणी साचून राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा जमिनीत कोणतेही पीक घेणे शक्य होत नाही. मात्र बिहार या राज्यातील पूरग्रस्त भागातील एका शेतकऱ्याला देखील अशीच काहीशी समस्या होती. त्याच्या शेतात पावसाळ्याच्या कालावधीत सात महिन्यापर्यंत पाणी साचून राहत होते. यावरही या शेतकऱ्याने मात करत शिंगाडा या फळाच्या लागवडीतून एका हंगामात दीड लाख रुपयांचे उत्पन्न (Success Story) मिळवले आहे.
शिंगाडा फळाबद्दल थोडक्यात (Success Story Of Water Chestnut Cultivation)
शिंगाडा या फळाला उपवासाच्या काळात विशेष मागणी असते. शिंगाड्याची लागवड प्रामुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात तलाव, शेततळे, तसेच भातपिकासारख्या खाचरांमध्ये केली जाते. ज्या शेतकऱ्यांच्या नैसर्गिक शेततळ्यात पाणी असते किंवा अति पावसामुळे शेतात कायम पाणी साचून राहते. त्यांना या पिकाची लागवड करता येते. शिंगाड्याच्या फळामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. फळाची जाडी दोन सेंटिमीटर इतकी असते. फळाचा गर मऊ असतो व चव किंचित गोड असते. शिंगाड्याचे कंद व फळांना उपवासामध्ये विशेष मागणी असल्याने, ते पाणथळ शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते.
घेतायेत दोन पिके
बिहारचा मधुबनी जिल्हा म्हणजे नेहमीच पूरग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा भाग आहे. येथील बिंदेश्वर रावत या शेतकऱ्याने कृषी विज्ञान केंद्रात (Success Story) जाऊन, आपल्या शेतीमध्ये नेहमीच साचणाऱ्या पाण्याच्या समस्येबद्दल माहिती संबधित अधिकाऱ्यांना दिली. त्यावेळी बिंदेश्वर रावत यांना शिंगाड्याच्या लागवडीची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी नैसर्गिक पद्धतीने शिंगाड्याच्या फळाची लागवड करणे सुरु केले. अर्थात पावसाळ्यात शिंगाडा लागवड आणि रब्बी हंगामात कडधान्याची लागवड अशी दोन पिके त्यांना सध्या आपल्या शेतीत घेणे शक्य होत आहे. यापूर्वी पूर आणि अति पावसामुळे त्यांचे शेत पडून राहत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दोन पिकांच्या माध्यमातून त्यांना चांगला आर्थिक फायदा होत असल्याचे ते सांगतात.
कशी करतात लागवड?
बिंदेश्वर रावत सांगतात की, “शिंगाड्याच्या लागवडीची तयारी फेब्रुवारी महिन्यापासूनच करावी लागते. सध्या रोपे तयार केली जातात. तर जून आणि जुलै महिन्याच्या कालावधीत ती एक मीटर अंतरावर पाणथळ शेतात लावली जातात. रोपे तयार करताना व्यावसायिक पद्धतीने लागवड बियाण्याद्वारे केली जाते. पूर्ण पिकलेले शिंगाड्याचे फळ एका भांड्यामध्ये पाणी टाकून त्यात उगवण्यासाठी ठेवावे लागते. काही दिवसांनी त्याला कोंब फुटतात. कोंब फुटलेले शिंगाडे वेगळे करून, रोपवाटिकेतील पाण्याच्या टाकीत सोडावे लागतात. पावसाळ्याच्या सुरवातीस त्याची लागवड केली जाते. लागवडीसाठी शेतात गुडघाभर पाणी पुरेसे होते. रोपांची या गुडघाभर पाण्यात १ × २ मीटर किंवा २ × ३ मीटर अंतरावर लागवड करावी. पूर्ण वाढ झालेल्या वेलांचाही बियाणे म्हणून वापर करता येतो.”
किती उत्पन्न मिळाले?
बिंदेश्वर रावत यांच्या माहितीनुसार, एक हेक्टर पाणथळ शेतीतून किंवा भाताच्या खाचरा सारख्या तलावातून जवळपास 100 क्विंटल शिंगाडा पिकाचे उत्पादन मिळते. ज्यातून नैसर्गिक शेतीतून पावसाळ्याच्या महिन्यात आपल्याला दीड लाख रुपये निव्वळ नफा कमावता येतो. त्यामुळे अति पावसाळा आणि पूरग्रस्त भागात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, जमीन पडून राहण्यापेक्षा शिंगाड्याची शेती हा उत्तम पर्याय असल्याचे शेतकरी बिंदेश्वर रावत सांगतात.