Success Story : कांदा पिकाला कंटाळले; रेशीम शेतीतून साधली प्रगती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाचा लहरीपणा आणि हमीभावाचा न सुटणारा तिढा यामुळे दिवसेंदिवस शेती (Success Story) करणे अवघड बनत चालले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील देविदास जाधव या शेतकऱ्याने निसर्गाच्या परिणामाला फाटा देत, हुकमी भाव देणाऱ्या रेशमी शेतीची कास धरली आहे. ऐन काढणीला आला की कांदा दरात होणाऱ्या घसरणीला कंटाळलेल्या देविदास यांनी रेशीम शेतीची निवड करत चांगली प्रगती साधली आहे. आज आपण देविदास यांच्या रेशीम शेतीची यशोगाथा (Success Story) जाणून घेणार आहोत.

शेतकरी देविदास जाधव यांची (Success Story) वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे वडिलोपार्जित 5 एकर जमीन आहे. आपल्या या जमिनीमध्ये ते कापूस, मका, कांदा ही पारंपरिक पिके घेतात. मात्र ऐन हंगामात पीक काढणीला आले की भाव न मिळणे ही समस्या जाणवत असलेल्या देविदास यांनी वेगळा मार्ग शोधण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी 2016 साली रेशीम शेतीची माहिती मिळवत एक एकरात रेशीम शेती करणे सुरु केले. आज त्यांनी आपल्या तीन एकर जमिनीत तुतीची लागवड केली असून, 5 बाय 2 असे अंतर त्यासाठी निश्चित केले आहे. रेशीम कोषांसाठी त्यांनी दोन शेड उभारले असून, जालना येथून अंडीपुंज त्यांनी उपलब्ध केले आहे.

किती मिळते उत्पन्न? (Success Story Of Silk Farming)

देविदास हे सध्या आपल्या दोन शेडच्या माध्यमातून वर्षाला आठ ते दहा बॅच घेत आहेत. एका बॅचसाठी साधारणपणे 25 ते 28 दिवस लागतात. एकरी 150 अंडीपुंज म्हणजेच जवळपास 97 हजार 500 रेशीम अळीपासून एका बॅचमधून सरासरी 120 ते 140 किलो रेशीम कोष मिळतो. या रेशीम कोषाला बाजारात 300 ते 500 रुपये प्रति किलोचा दर मिळतो. ज्यामुळे त्यांना एका बॅचमधून महिन्याला 60 ते 65 हजार रुपये इतके उत्पन्न मिळते.

रेशीम शेती करताना कुटुंबातील सर्व सदस्यांचे काम करताना सहकार्य खूप गरजेचे असते. कारण तुतीची कापणी, अळ्यांना वेळेवर खायला घालणे ही तारेवरची कसरत असते. त्यासाठी निर्धारित वेळेत काही गोष्टी होणे गरजेचे असते. वातावरणातील बदलानुसार शेडमधील वातावरण अळ्यांना सहनशील ठेवावे लागते अन्यथा त्या मरतात. असे देविदास सांगतात.

अंडीपुंजच्या विक्रीतुनही नफा

शेतकरी देविदास जाधव हे जालना येथून अंडीपुंज उपलब्ध करत असून, ते आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी मार्गदर्शन करत आहे. तसेच जे शेतकरी नव्याने रेशीम शेती करण्यास इच्छुक असतील त्यांना ते घरपोच अळ्यांचे अंडीपुंज पाठवतात. अंडीपुंजच्या विक्रीतुनही त्यांना वार्षिक 3 ते 4 लाख रुपयांचा नफा मिळत असलयाचे ते सांगतात.

error: Content is protected !!