हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळी हंगाम म्हटले की भाजीपाला पिकांना विशेष महत्व (Success Story) प्राप्त होते. राज्यातील सर्वच भागांमध्ये उन्हाळयात पाण्याची कमतरता असल्याने, या दिवसांमध्ये भाजीपाल्याला मोठी मागणी देखील असते. ज्यामुळे योग्य तो दर मिळाल्याने उन्हाळी भाजीपाला पिकांमधुन शेतकऱ्यांना मोठे आर्थिक उत्पन्न देखील मिळते. आज आपण परभणी जिल्ह्यातील अशाच एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी अर्धा एकर उन्हाळी भेंडी लागवडीतून बक्कळ कमाई केली आहे.
गणेश पुदगाणे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते परभणी जिल्ह्यातील दस्तापुर येथील रहिवासी आहेत. मराठवाडा विभागात सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना शेतकरी गणेश पुदगाणे यांनी आपल्याकडील उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन (Success Story) करून, भेंडीची लागवड केली आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यात देखील पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना आणखी एका सुभाष जाधव या शेतकऱ्याने कोबी आणि सुभाष पवार या शेतकऱ्याने टरबूज लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.
भेंडीतून आतापर्यंत लाखाची कमाई (Success Story Of Farmer)
दस्तापुर येथील शेतकरी गणेशराव पुदगाणे हे हंगामी पिके घेतात. यावर्षी त्यांनी वीस गुंठ्यात उन्हाळी पिक म्हणून भेंडीची लागवड केली आहे. सध्या बाजारभाव चांगला मिळत असून, त्यांना आतापर्यंत एक लाख रुपये भेंडीच्या उत्पनातून (Success Story) मिळाले आहे. सध्या भेंडीचा सोळावा तोडा झाला आहे. त्यांचे भेंडीचे पीक हे आणखी दोन महिने चालणार आहे. या कडक उन्हातही भेंडीचा फड हिरवा गर्द असून, वेळेवर खतपाणी मिळत असल्याने फुल धारणा चांगल्या पद्धतीने होत आहे. ज्यामुळे त्यातून आपल्याला आणखी उत्पन्नाची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नांदेडच्या शेतकऱ्याचीही उन्हाळी कोबीतून भरारी
दरम्यान, नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील शेतकऱ्याने कोबीची लागवड केली. कोबी लागवडीतून या शेतकऱ्याने चांगले उत्पन्न घेतले आहे. सुभाष जाधव असे कोबी उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव यांनी आपल्या 30 गुंठे शेतीत कोबीची लागवड केली. पाण्याचे योग्य नियोजन करून वाढत्या तापमानात देखील त्यांनी कोबीची शेती फुलवली. 30 गुंठे गोबी लागवडीतून जाधव यांना 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने गोबीला बाजारात चांगला भाव मिळत आहे. कोबी काढणी सुरू असून जाधव यांना अजून एक लाख रुपये कोबी लागवडीतून मिळण्याची अपेक्षा आहे.
टरबूज शेतीतून लाखोंचे उत्पन्न
नांदेडच्या नायगाव तालुक्यातील शेतकऱ्याने टरबूजाच्या शेतीतून लाखों रुपयांचे उत्पन्न मिळविले. सुभाष पवार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पवार यांनी आपल्या दिड एकर शेतीमध्ये टरबूजाची लागवड केली आहे. टरबूज लागवडीसाठी त्यांना साठ हजार रुपय खर्च आला. खर्च वगळता टरबूज लागवडीतून त्यांना दिड लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.