Sugar Industry: ऊस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! काटामारी रोखण्यासाठी संगणकीकरणाचा प्रस्ताव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांसाठी (Sugar Industry) महत्वाची बातमी आहे. उसाच्या वजनातील काटेमारी रोखण्यासाठी संगणकीकरणाचा प्रस्ताव राज्याच्या नियंत्रक वैधमापन विभाग व अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे.यापूर्वी काटेमारी च्या बाबतीत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील हा विषय लावून धरला होता. मात्र आता साखर आयुक्त शेखर गायकवाड स्वात: या विषयावर काम करीत असून संगणकीकरण होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

नियंत्रक डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी राज्यातील सर्व वैधमापन शास्त्र सहनियंत्रकांना एक पत्र पाठविले आहे. नव्या कार्यप्रणालीचा अवलंब करून क्षेत्रिय वैधमापन शास्त्र अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांमधील वाहन काट्यांची तपासणी करावी, असेही या पत्रात म्हटले आहेत.

‘‘राज्यातील सर्व कारखान्यांमधील वजन काट्यांचे कॅलिब्रेशन एकसमान (Sugar Industry) करावे लागेल. संगणकाच्या माध्यमातून एकसमानता आणल्यास गैरप्रकार थांबू शकतील. संगणकीय प्रणाली नेमकी कशी असावी, या बाबत अभ्यास केला जाणार आहे. मात्र खासगी वजनकाट्यांची पावती ग्राह्य न धरण्याची भूमिका साखर कारखान्यांना सोडावी लागेल. कारण वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकांनीच सर्व काटे एकसमान असल्याचा निर्वाळा दिला आहे,’’ अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

‘‘साखर कारखान्यांमधील उसाच्या वजनात शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी वैधमापन शास्त्र कार्यालयाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे काट्यांची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वजनातील फसवणुकीला आळा घालण्यासाठी काही शिफारशी सुचविल्या आहेत. त्यानुसार काट्यांची तपासणी करण्यासाठी आता प्रमाणित संचालन प्रणाली नव्याने तयार करण्यात आली आहे,’’ असे नियंत्रकांनी नमूद केले आहे.

नियंत्रकांनी दिल्या ‘या’ सूचना

-लोडसेल ते जंक्शन बॉक्स व जंक्शन बॉक्स ते इंडिकेटरपर्यंतच्या सर्व केबल्स अखंड व न कापलेल्या असतील. आवरण कुठेही काढलेले नसावे. केबल्सवर चिकटपट्ट्या लावलेल्या नसाव्यात.

-लोडसेल ते इंडिकेटरपर्यंतच्या केबल्सवर कोणतेही छुपे उपकरण लावू नये.

-आयटी कीट मॉडेल अॅप्रूव्हल असलेल्या वाहन काट्यालाच संगणक प्रणाली उपलब्ध असावी.

-वे इंडिकेटरला प्रिटिंग सुविधा असावी. पावतीवर वाहन क्रमांक नोंद करून सही शिक्क्यासह पावती द्यावी.

डिजिटल सुविधा या हंगामात नाही

साखर कारखान्यांमधील काटामारी रोखण्यासाठी डिजिटल इंडिकेटर (Sugar Industry) वापरण्याची सक्ती वैधमापन शास्त्र विभागाने या हंगामापासून लागू केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘‘सध्याच्या अॅनॉलॉग लोट सेल असलेल्या जागेवर डिजिटल लोड सेलसह इंडिकेटर बसविण्याची सुधारणा पुढील गाळप हंगामापासून करा, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचे फावले आहे,’’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

संदर्भ : ऍग्रोवन

error: Content is protected !!