एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत ऊसतोडी बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एफआरपीचे तुकडे न करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे एकरकमी एफआरपी मिळावी, यासह इतर प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी (ता. १७) ऊस तोडी बंद आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्यांत बहुतांशी करून ऊसतोडी बंद राहिल्या. पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांत मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तोडी बंद होत्या.

यंदाच्या हंगामात कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली नाही. तसेच तुकड्यात एफआरपी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या विरोधात ‘स्वाभिमानी’चे संस्थापक राजू शेट्टी यांनी ऊस तोडी बंदची घोषणा केली होती. कारखान्यांनी स्वतःहून दोन दिवस तोडी बंद ठेवाव्यात, असे आवाहन केले होते. यानुसार कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यांतील काही कारखान्यांनी स्वतःहून ऊस तोडणी बंद केल्याने वादाचे प्रसंग उद्भवले नाहीत.

सांगलीत गांधीगिरी पद्धतीने ऊसतोड बंद

सांगली जिल्‍ह्यात काही ठिकाणी ऊसतोड सुरू असल्याने गांधीगिरी पद्धतीने ऊसतोड बंद करण्यात आली. यावेळी खानापूर तालुक्यातील उदगिरी आणि पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्यावर ‘स्वाभिमानी’ने धडक दिली. शिवारातील ऊस तोडी बंद केल्या. आज (ता.१८) कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला असून ऊस वाहतूक आढळून आल्यास पेटवून देऊ, असा इशारा संघटनेने दिला.

साताऱ्यात ट्रॅक्टर पेटवला

इंदोली गावाजवळ ट्रॅक्टर ऊस वाहतूक करत असल्याने अज्ञात आंदोलकांनी मध्यरात्री ट्रॅक्टरच पेटविला. त्याची माहिती समजताच उंब्रज पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाची ठिणगी पडली आहे. स्वाभिमानीच्या आंदोलनाला नगर, सोलापूर जिल्ह्यांत संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील माढा, पंढरपूर भागांत कारखान्यांनी स्वतःहून तोडणी बंद केल्या होत्या.

नाशिकमध्ये वाहने अडविली

‘स्वाभिमानी’ने दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर ऊसतोड बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी पदाधिकाऱ्यांनी उसाची वाहने अडविली. प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी सहकार नेते सुरेश डोखळे, जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, राजू शिरसाट, परशराम शिंदे, गंगाधर निखाडे, सचिन बर्डे, नरेंद्र जाधव, कुबेर जाधव यांची भाषणे झाली.

कोल्हापुरात शांतता

जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी अगोदरच ऊसतोडणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने गुरुवारी दिवसभर ऊसतोडणी बंद राहिली. शिरोळ व राधानगरी तालुक्यांत एक-दोन ठिकाणी सुरू असलेली तोडणी बंद करण्याचा प्रकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

error: Content is protected !!