हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये ऊस शेती (Sugarcane Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. ऊस शेतीसाठी बारामाही पाण्याची आवश्यकता असल्याने प्रामुख्याने मोठ्या नद्या किंवा धरणांच्या लाभक्षेत्रात ऊस लागवडीखालील क्षेत्र मोठया प्रमाणात आढळते. अशा भागांमध्ये साखर कारखान्यांची संख्याही अधिक असते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन होते. आणि कोणते तीन राज्य सर्वाधिक उसाचे उत्पादन (Sugarcane Cultivation) घेतात. आज आपण याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
उत्तरप्रदेश ‘साखरेचे कोठार’ (Sugarcane Cultivation In India)
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, उत्तरप्रदेश या राज्यात देशातील सर्वाधिक ऊस लागवडीखालील क्षेत्र (Sugarcane Cultivation) असून, उत्तरप्रदेशात देशातील सर्वाधिक साखर उत्पादन देखील होते. त्यामुळे उत्तरप्रदेश या राज्याला देशाचे साखरेचे कोठार असे म्हटले जाते. त्या ठिकाणी देशातील एकूण ऊस उत्पादनापैकी 44.50 टक्के ऊस उत्पादन नोंदवले जाते. परिणामीस्वरूप, इतर राज्यांच्या तुलनेत ऊस उत्पादन अधिक असल्याने, साखर उत्पादनही त्या ठिकाणी अधिक होते. उत्तरप्रदेशातील सहारनपुर, बुलंदशहर, मेरठ आणि बरेली या जिल्ह्यांमध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कारखाने
मात्र, असे असले तरी महाराष्ट्र या राज्यात सर्वाधिक साखर कारखान्यांची संख्या आहे. उत्तरप्रदेशनंतर ऊस उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून देशातील एकूण ऊस उत्पादनापैकी 25.45 टक्के ऊस उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ऊस लागवड होते. याशिवाय याच भागात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने एकवटलेले आहेत.
तीन राज्यात ८० टक्के उत्पादन
तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक हे राज्य असून, त्या ठिकाणी देशातील 10.54 टक्के ऊस उत्पादन घेतले जाते. अर्थात देशातील उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन आघाडीच्या राज्यांमध्ये देशातील एकूण ८० टक्के उसाचे उत्पादन होते. तर उर्वरित 20 टक्के उसाचे उत्पादन देशातील अन्य भागामध्ये होत असल्याचे पाहायला मिळते. उसापासून तयार झालेली साखर ही दैनंदिन स्वरूपात वापरली तर जातेच. याशिवाय उसाचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत. अनेक आजारांवर उसाचे योग्य त्या प्रमाणात सेवन केल्यास फायदेशीर मानले गेले आहे. यामध्ये डोळ्यांची दृष्टी, सर्दी-खोकला, कफ या आजारांवर उसाचे सेवन लाभदायी मानले गेले आहे.