हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दरवाढीच्या (Sugarcane Rate) आंदोलनाला यश आले आहे. मागील हंगामातील उसाला अतिरिक्त 100 रुपये प्रति टन तर चालू हंगामातील उसाला 100 रुपये प्रति टनाचा (अर्थात 3100 रुपये) दर (Sugarcane Rate) वाढवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सहमती दर्शवली आहे. याबाबतचे कारखान्यांच्या सहमतीचे एक पत्र कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले चक्का जाम आंदोलन मागे घेतले आहे.
मागील वर्षीच्या हंगामातील उसाला 400 रुपये प्रति टनाचा दुसरा हप्ता तसेच यावर्षीच्या हंगामात उसाला प्रतिटन 3500 रुपये दर द्यावा. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या दोन महिन्यांपासून लावून धरली होती. या मागणीसाठी संघटनेने गुरुवारी (ता.23) पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथील पुलावर तब्बल आठ तास चक्का जाम आंदोलन केले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दोन पावले मागे जात 100/50 च्या फॉर्म्युल्याला सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता चक्का जाम आंदोलन मागे घेतल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
काय आहे 100/50 च्या फॉर्म्युला? (Sugarcane Rate In Maharashtra)
मागील वर्षीच्या गळीत हंगामामध्ये ज्या साखर कारखान्यांनी प्रति टन 3000 रुपये पेक्षा जास्त दर दिला आहे. अशा कारखान्यांकडून शेतकऱ्यांना प्रति टन 50 रुपये दिले जाणार आहे. तर ज्या साखर कारखान्यांनी मागील हंगामात 2900 रुपये प्रति टन दर दिला होता. अशा सर्व कारखान्यांकडून शेतकऱ्यांना प्रति टन 100 रुपये दिले जाणार आहे. याशिवाय चालू हंगामासाठी शेतकऱ्यांच्या उसाला पहिला हप्ता प्रति टन 3100 रुपये देण्यास कारखान्यांनी सहमती दर्शवली आहे. याबाबतचे सहमतीपत्र कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केले आहे.
शाहू महाराजांचाही पाठिंबा
दरम्यान, चक्का जाम आंदोलनच्या स्थळी जाऊन शाहू महाराजांनी अचानक भेट देत राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. यामुळे राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला छत्रपतींनी पाठिंबा दिल्याने आणखी बळ मिळाले. शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे ते त्यांना मिळाले पाहिजे, संबंधितांनी यावर तोडगा काढावा, अशी भूमिका त्यांनी आंदोलनस्थळी व्यक्त केली होती.