हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..

लिलावात कांद्याला अवघ्या 75 पैश्यांचा भाव, शेतकरी हतबल

हॅलो कृषी ऑनलाईन : अपार कष्ट केल्यानंतर कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याला कमीत कमी भाव प्रति क्विंटल साठी १०० रुपये मिळत होता आता तो ७५ रुपयांवर घसरला. म्हणजेच कांद्याला प्रति किलो ७५ पैशांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. हा दर औरंगाबादच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे. या बाजार समितीत तीन दिवसांत 7 हजार 851 क्विंटल कांद्याची आवक झाली. परिणामी किमान 75 रुपये प्रतिक्विंटल म्हणजे 75 पैसे किलो नीचांकी भाव मिळाला.

निसर्गाची साथ मिळाल्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा औरंगाबाद,जालना आणि बीड जिल्ह्यात कांद्याच्या लागवडीत 20 हजार हेक्टरने वाढ झाली. त्यात खरीप पेरणीसाठी हाती आलेला कांदा विकण्याची शेतकरी घाई करू लागले आहेत. त्यामुळे कांदा बाजारात मागणीच्या तुलनेत आवक प्रचंड वाढली असल्याने नीचांकी भाव मिळत आहे. औरंगाबादच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत 75 पैसे, सर्वसाधारण 4 रुपये 50 पैसे आणि कमाल 8 रुपयांपर्यंत प्रतिकिलो भाव मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा कांद्याने शेतकऱ्यांचे वांदे केल्याचे पाहायला मिळाले.

40 गोण्याचे बाराशे रुपये मिळाले…

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भारत गंगाधर जाधव या शेतकऱ्याने 40 कांद्याच्या गोण्या विक्रीसाठी नेल्या असता अवघा १ रुपयाचा भाव मिळाला. यातून त्यांच्या हातात 1200 रुपये आले आणि वाहतूकसह 3300 रुपये खर्च झाला. उर्वरित रक्कम त्यांना खिशातून भरावी लागल्याने त्यांनी बाजार समितीच्या आवारातच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.अशीच काही अवस्था राज्यभरातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.

error: Content is protected !!