यंदा ‘पणन’ची 50 केंद्रांवरच कापूस खरेदी, जाणून घ्या कधी सुरु होणार केंद्रे ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यवतमाळ 

मागील वर्षांपासून कापसाला चांगला भाव मिळत आहे यंदाच्या वर्षी देखील कापसाचा भावात तेजी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पणन महासंघाकडून यंदाच्या वर्षी कापूस खरेदी केंद्रे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर वर्षी पणन कडून ७० केंद्रांवर कापूस खरेदी करण्यात येते मात्र यंदाच्या वर्षी केवळ ५० केंद्रे सुरु करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. तसे पत्र शासनाला पाठविले असून, शासन काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

खरेदी केंद्रांची संख्या का केली कमी ?

राज्यात दोन वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांअभावी तारांबळ उडाली होती. त्यामुळेच पणन महासंघाने यंदापासून केवळ ५० केंद्रे सुरू करण्याचा ठराव घेतला आहे. अशातच आता ‘पणन’ची केंद्रे कमी झालेली आहेत. ‘सीसीआय’ची कापूस खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. पणनची केंद्रे नोव्हेबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. नोंदणीप्रक्रिया सुरू झाली असली तरी केंद्र उघडण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. आधीच मनुष्यबळ कमी असल्याने कामकाज चालविताना पणन महासंघाला अडचणी येत आहेत.

अमरावती विभाग हे प्रमुख कापूस उत्पादक प्रदेशात येते. दोन वर्षांपूर्वी हंगामात मोठ्या प्रमाणात पणन व ‘सीसीआय’च्या केंद्रांवर कापसाची खरेदी झाली होती. यंदा कापसाला खासगी बाजारात दर चांगले आहेत. परिणामी, यंदा ‘पणन’कडे कापसाची आवक राहणार नाही. असे असले तरी नियोजन म्हणून पणन महासंघाने ५० केंद्रे उघडण्याची तयारी दर्शविली आहे. यंदा पुरामुळे कपाशीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दसरा आला असला तरी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात कापूस आलेला नाही.

त्यातच आता खासगी बाजारात असलेल्या दरामुळे ‘पणन’कडे कापूस येण्याची शक्यता धूसर आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना आधार म्हणून ‘पणन’चे केंद्र सुरू केली जाणार आहेत. ‘सीसीआय’ किती केंद्रे उघडणार, याबाबत अजून स्पष्टता नसली तरी त्यांच्या केंद्रांची संख्यादेखील घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात व राज्यात किती केंद्रे, कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना आहे.

 

error: Content is protected !!