हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या आडसाली ऊस (Adsali Sugarcane) लागवडीचा कालावधी सुरू आहे. राज्यात मुख्यत्वे उसाची लागवड (Sugarcane Cultivation) आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामात केली जात असली तरी . आडसाली हंगाम फायदेशीर दिसून येतो. त्यामुळे शेतकरी सुद्धा आडसाली हंगामात ऊस (Sugarcane Crop) लागवडीला प्राधान्य देतात.
आडसाली ऊसाची (Adsali Sugarcane) उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य (Soil Health) व्यवस्थापन, सुधारित ऊस वाणांचा (Sugarcane Variety) आणि दर्जेदार बियाण्याचा वापर, रोप लागवड तंत्र, ठिबक सिंचनद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन (Water & Fertilizer Management), तण नियंत्रण (Weed Management) आणि आंतरमशागत (Intercultural Operations) या पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन (Sugarcane Production) मिळू शकेल. जाणून घेऊ याविषयी सविस्तर.
अधिक उत्पादन देणारे ऊस वाण
आडसाली ऊस (Adsali Sugarcane) लागवडीसाठी को. 86032 (निरा), कोएम 0265 (फुले 265), फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 आणि व्हीएसआय 8005 या अधिक उत्पादन देणार्या वाणांची लागवड करावी.
महाराष्ट्रामध्ये को 86032 वाणाची 50 ते 55 टक्के आणि फुले 265 वाणाची 30 ते 32 टक्के क्षेत्रावर लागवड केली जाते.
बेणे निवड
- लागणीसाठी ऊस बेणे (Sugarcane Seed Cane) मळ्यातील 9 ते 11 महिने वयाचे अनुवांशिकदृष्ट्या शुध्द आणि निरोगी बियाणे वापरावे.
- उसाचे बियाणे लांब कांड्यांचे व फुगीर डोळ्याचे आणि रसरशीत असावे. दर तीन वर्षानी बेणे बदलावे.
- आनुवंशिकदृष्ट्या शुध्द बेणे वापरल्यास ऊस (Adsali Sugarcane) उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते. 2023 मध्ये पाडेगाव केंद्राने शिफारस केलेल्या फुले सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानातून उसाची रोपे शेतामध्येच तयार करून लागवड करावी.
बेणे प्रक्रिया (Sugarcane Seed Treatment)
- उसावरील काणी रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच कांडीवरील खवले कीड व पिठ्या ढेकूण यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 100 ग्रॅम कार्बेन्डॅझिम व 300 मि.ली. डायमिथोएट 100 लिटर पाण्यात मिसळून बेणे 10 मिनिटे बुडवावे.
- वरील प्रक्रियेनंतर अॅसिटोबॅक्टर 10 किलो व स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत 1.25 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी 30 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
- जीवाणू खताच्या प्रक्रियेमुळे 50 टक्के नत्र व 25 टक्के स्फुरद खताची बचत होते.
लागवड तंत्र (Sugarcane Cultivation Method)
- आडसाली उसाची (Adsali Sugarcane) लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत करावी.
- रिजरच्या सहाय्याने भारी जमिनीत 150 सें.मी. व मध्यम भारी जमिनीत 120 ते 135 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
- सरीची लांबी उतारानुसार 20 ते 40 मीटर ठेवावी.
- एक डोळा पद्धतीने डोळा वरच्या बाजूस ठेवून 1 फुट अंतरावर व दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपऱ्यामधील अंतर अर्धा फूट ठेवून लागण करावी.
- जोडओळ पट्टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी 2.5 फुटावर तर भारी जमिनीसाठी 3 फुटावर सलग सऱ्या पाडाव्यात.
- भारी जमिनीत कोरड्या पद्धतीने आणि हलक्या जमिनीत ओल्या पद्धतीने उसाची टिपरीने लागवड करावी, जेणेकरून टिपरी पद्धतीने लागवड केलेल्या उसाची उगवण चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होईल.
- रोपांनी लागवड करताना सरी ओली करून त्यानंतरच लागवड करावी किंवा उसाची रोपे पाण्यामध्ये दाबून लागवड करावी. जेणेकरून रोपांची मर होत नाही.
आडसाली उसातील आंतरपिके (Sugarcane Intercrops)
आडसाली हंगामात आंतरपिके घेताना योग्य आंतरपिकाची निवड करणे गरजेचे आहे, अन्यथा आंतरपिकामुळे मुख्य ऊस पिकाकडे दुर्लक्ष होऊन उत्पादनात घट येते.
आडसालीमध्ये (Adsali Sugarcane) खरीप हंगामातील भुईमुग, चवळी, सोयाबीन व भाजीपाला इत्यादी आंतरपिके घेता येतात. ऊस पिकामध्ये ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपिक म्हणून समावेश करता येतो व बाळबांधणीच्यावेळी हिरवळीची पिके सरीमध्ये गाडून बाळ बांधणी करता येते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यास मदत होते.