Tomato Disease Management : टोमॅटोवरील रोग व किडींचे व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : टोमॅटो पिकावर भाजीपाला पिकांमधील जवळजवळ सर्व रोग व किडी (Tomato Disease Management) आढळून येतात. त्यासाठी जर शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड नियंत्रण राबवले तर बऱ्यापैकी किडींचा बंदोबस्त करता येतो. टोमॅटोवर फुलकिडे, मावा, पांढरी माशी, कोळी, नाग अळी, फळ पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.

टोमॅटोवरील रोग नियंत्रण (Tomato Disease Management)

मररोग : हा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे झाडे अचानक वाळायला लागतात. झाड उपटले असता मुळे कुजलेली दिसतात. रोपवाटिकेतील रोपे मरगळलेली, मान पडलेली दिसतात. ट्रायकोडर्मा व्हीरीडी 1.5 टक्के डब्ल्यु.पी. 20 ग्रॅम/कि.ग्रॅ. बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
करपा : करपा हा रोग लवकर येणारा व उशिरा येणारा अशा दोन प्रकारचा असतो. यामध्ये पानांवर पिवळसर डाग पडून नंतर गोल काळे तपकिरी ठिपके दिसू लागतात. नंतर पाने वाळतात. यासाठी मँकोझेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम किंवा प्रोपिनेब 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारण्या आलटून-पालटून कराव्यात.

विषाणूजन्य रोग– विषाणू रोगामध्ये अनेक वेगवेगळे रोग (Tomato Disease Management) आहेत. परंतु टोमॅटो पिकावर प्रामुख्याने करपा (स्पॉटेड विल्ट व्हायरस) व पर्णगुच्छ (लिफकर्ल व्हायरस) हे प्रमुख विषाणू रोग आढळतात. या रोगांची लागण अगदी रोपवाटिकेमधून सुरुवातीपासून होण्याची शक्यता असते. हे रोग अनुक्रमे फुलकिडे, पांढरी माशी या किडीमुळे प्रसार पावतात. त्यासाठी या किडींचा सुरुवातीपासून बंदोबस्त केल्यास ह्या घातक रोगांचे प्रमाण कमी ठेवता येते. शेतीमध्ये हे रोग आढळल्यास कमी प्रमाणात असतानाच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. या किडींच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट 30 ई.सी. 15 ते 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आठवड्याच्या अंतराने साध्या हातपंपाने फवारण्या कराव्यात.

नागअळी : या किडीच्या अळ्या पानांच्या पापुद्र्यात शिरून मधील हिरवा भाग पोखरून खातात. त्यामुळे पांढरी पडतात व पानांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम होतो. यासाठी रोपे लागवड करताना लागण झालेल्या रोपांची कीडग्रस्त पाने काढून टाकावीत. लागवडीनंतर नागअळीचा प्रादुर्भाव दिसू लागताच 4 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

फळ पोखरणारी अळी : ही अळी प्रथम पाने खाते व नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरून आत शिरते व गर खाते. या किडीच्या नियंत्रणासाठी 20 मि.ली. क्विनॉलफॉस 25 टक्के ईसी किंवा 15 मि.ली. नोव्हॅलीरॉन 10 टक्के ईसी किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 18.5 टक्के एस.सी. 3 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. हेलिओथीस न्युक्लिअर पॉलिहेड्रोसीस व्हायरस (एच.ए.एन.पी.व्ही.) विषाणू 200 मि.ली. प्रति 200 लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळेस फवारावे.

error: Content is protected !!