हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, टोमॅटोच्या दरात (Tomato Market Rate) मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे टोमॅटोच्या दरात जवळपास 40 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. एका बाजूला देशात तापमानात वाढ होत आहे. परिणामी, टोमॅटोच्या मागणीत वाढ होत आहे. मागणी वाढली तरी दर मात्र वाढत नसल्याचे दिसत आहे. दरात घसरणच होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये अनेक राज्यातून टोमॅटोची आवक होत असते. आवक वाढल्यामुळे टोमॅटो दरात (Tomato Market Rate) घसरण झाल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
किती मिळतोय दर? (Tomato Market Rate)
टोमॅटोच्या दरात 40 टक्क्यांची घसरण झाली आहे. उत्तर प्रदेशात टोमॅटोचा प्रति क्विंटल किमान भाव 1600 रुपयापर्यंत इतका खाली आला आहे. तर दिल्लीत 800 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. दर घसरल्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. मात्र, याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. दिल्लीच्या बाजारात हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये टोमॅटोच्या दरात 40 टक्क्यांची घसरण झाली आहे.
5 ते 15 रुपये प्रतिकिलोचा दर
दिल्लीतील आझादपूर टोमॅटो असोसिएशनच्या माहितीनुसार, राजस्थानसारख्या राज्यातून टोमॅटोची आवक चांगली झाली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्येही किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. गुणवत्तेनुसार, दिल्ली, उत्तर प्रदेशसह इतर घाऊक बाजारात टोमॅटोचे घाऊक दर सुमारे 5 ते 15 रुपये प्रतिकिलो आहेत. या मिळणाऱ्या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
महाराष्ट्रात काय आहे स्थिती?
देशपातळीवरील टोमॅटो दरांप्रमाणे महाराष्ट्रात देखील टोमॅटो दरात मोठी घसरण दिसून आली आहे. राज्यात सध्या टोमॅटोला सरासरी 750 ते 1000 रुपये प्रति क्विंटल इतका निच्चांकी दर मिळत आहे. ज्यामुळे सध्या उन्हाळाभर टोमॅटो पिकासाठी कष्ट घेऊनही चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. ज्यामुळे सध्या खरिपातील टोमॅटो लागवडीकडे शेतकरी पाठ फिरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.