सोयाबीन,कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवरून तुपकरांनी घेतली तोमर यांची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे प्रश्न घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मध्यंतरी अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलनामुळे चांगलेच चर्चेत आले होते. याच प्रश्नावरून तुपकर यांनी बुधवारी (ता.१४) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, माजी कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली घेत चर्चा केली.

राज्यातील सोयाबीन- कापूस प्रश्नांवर चर्चा करताना सोयाबीन, कापसाच्या आयात-निर्यात धोरणात बदल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री या नात्याने पंतप्रधान व वाणिज्य मंत्र्यांना पत्र लिहून पाठपुरावा करावा, अशी मागणी तुपकर यांनी तोमर यांच्याकडे केली. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘पाठपुरावा करतो,’ असे सांगितले.

तुपकर यांनी शरद पवार यांची भेट घेत सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर आपण हस्तक्षेप करून केंद्राकडे स्वतंत्रपणे हा प्रश्न लावून धरावा, अशी विनंती केली. यावेळी पवार यांनी प्रत्येक मागणीवर खुलासेवार चर्चा केली. वाणिज्य मंत्री व कृषिमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जीएम सोयाबीनला परवानगी मिळावी, ही मागणीही लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहेत मागण्या

–सोयाबीन, कापसाला दरवाढ मिळण्यासाठी केंद्र सरकारने आयात-निर्यात धोरणात बदल करून, यामध्ये सोयापेंड व सूत निर्यातीला प्रोत्साहन द्यावे.
— सोयापेंड आयात करणार नाही, हे केंद्र सरकारने स्पष्ट जाहीर करावे.
–यावर्षी १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, जीएम सोयाबीनच्या लागवडीस परवानगी द्यावी.
–सोयाबीनवरील पाच टक्के जीएसटी रद्द करावा.
–खाद्य तेलावरील (पाम तेल, रिफाइंड, सोयाबीन व सूर्यफूल तेल) आयात शुल्क ३० टक्के करावे.
–कापसाचे आयात शुल्क तांत्रिक दृष्ट्या ११ टक्के झाले आहे, ते नियमित लागू करावे, अशा मागण्या तुपकर यांनी केल्या.

 

error: Content is protected !!