Unseasonal Rain : अवकाळी पावसाचे थैमान सुरूच; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आजही सर्वदूर पाऊस!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) जोर कायम असून, आजही (ता.16) दुपारी काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज दुपारच्या सुमारास लातूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह, विजेच्या गडगडाटात तुफान पाऊस झाला आहे. ज्यामुळे लातूरमध्ये वीज पडल्याने एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातही अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने खामगाव, शेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला आहे.

रायगड, रत्नागिरीतही तुफान पाऊस (Unseasonal Rain In Maharashtra)

दरम्यान, रायगडमध्ये दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. रायगडच्या महाड, माणगाव, पोलादपूर , म्हसळा श्रीवर्धन भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. लोनेर परिसरातही आज दुपारी गारांचा पाऊस कोसळला आहे. तर विजांच्या कडकडाटासह रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण आणि परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाच्या आगमनाने उष्णतेने त्रस्त नागरिक सुखावले आहे. मात्र, आंबा बागायतदार चिंतेत आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत कडक उन्हाचे चटके बसत असताना अचानक रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पाऊस झाला आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

याशिवाय आज दुपारी पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरातही जोरदार पाऊस झाला आहे. आजच्या या पावसामुळे मावळ आणि लोणावळा भागातील धबधबे ऐन उन्हाळ्यात प्रवाहीत झाले आहेत. दुपारी अचानक मावळात मेघगर्जनेसह वळवाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे पावसाने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळा येथे बोरघाटात जागोजागी धबधबे प्रवाहित झाले. परिणामी, वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले आहे.

सर्वदूर पावसाची हजेरी

तर नाशिक जिल्ह्यातही आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. ज्यात नामपुर येथील एका शेतकऱ्याचे पोल्ट्री शेड उध्वस्त झाले असून, ज्यात 400 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात जोरदार वादळासह आज पाऊस पाहायला मिळाला. वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले असून, उन्हाळी मका, बाजरी, ज्वारी या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने राज्यात आज (ता.16) पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक या जिल्ह्यांसह सर्वदूर अवकाळी पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

error: Content is protected !!