Unseasonal Rain : नाशिकसह अर्ध्या महाराष्ट्राला पावसाने झोडपले; वीजपुरवठा खंडित, पिकांचे नुकसान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) धुमाकूळ सुरूच आहे. शनिवारी (ता.11) सायंकाळनंतर रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे नाशिकसह अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपले आहे. नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी, निफाड, मालेगाव, चांदवड, नांदगाव, मनमाडसह परिसरात विजांच्या कडकडाटासह रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रात्रभर वीज गायब होती. तर सकाळी देखील वीजपुरवठा पूर्ववत होण्यास मोठा अवधी लागल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यात 30 झाडे कोसळली (Unseasonal Rain In Maharashtra)

दरम्यान, पुण्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शहरात 30 ठिकाणी झाडेपडीच्या घटना घटल्या आहेत. पुण्यात प्रामुख्याने लोहगाव, ढोले पाटील रोड, पद्मावती पंपिंग स्टेशन, सहकार नगर, औंध, गुरुवार पेठ, एनआयबीएम रोड, शनिवार वाडा, कसबा पेठ, धानोरी, कर्वेनगर, एम जी रोड अशा अनेक ठिकाणी या घटना घडल्या आहेत. या झाडे पडण्याच्या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.

पिकांचे मोठे नुकसान

तर धुळे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने आज (ता.12) पहाटेच्या सुमारास जोरदार हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. जिल्ह्यात प्रामुख्याने बाजरी, ज्वारी, त्याचबरोबर भुईमुग आणि उन्हाळी कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर नाशिकसह मालेगाव परिसरातील द्राक्ष बागांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

सिंधुदुर्गमध्येही पावसाची हजेरी

याशिवाय कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यातील काही भागात आज (ता.12) मध्यरात्री अवकाळी पाऊस झाला आहे. त्या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अचानक आलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली होती. मात्र, असे असले तरी उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे निर्माण झालेल्या गारव्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

पावसाचे वातावरण कायम राहणार

दरम्यान, महाराष्ट्रावर समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीपर्यंत चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच चक्रीय वारा क्षेत्रापासून दक्षिण आसाममधील हाफलाँग व सिल्चरपर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंतच्या पातळीत पूर्व-पश्चिम पसरलेल्या हवेचा कमी दाबाचा आस तयार झाला आहे. त्यामुळे अवकाळी व गारपिटीचे वातावरण तयार झाले आहे. राज्यातील पावसाचे हे वातावरण पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!