राज्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळीचा तडाखा ; झाडे उन्मळून पडली , घरांचे पत्रे उडाले …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही भागात उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. तर काही भागामध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. काल संध्याकाळनंतर सातारा , कोल्हापूर , सांगलीच्या काही भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. संध्याकाळनंतर अचानक वादळी पावसामुळे काही नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याची माहिती आहे. तर साताऱ्यात झाडे उन्मळून पडल्याचे पहायला मिळाले. इस्लामपुरातील काही भाग , कोल्हापुरातील कागल सह काही भागात गारपीट झाल्याची माहिती आहे. आज मराठवाडा विदर्भांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर उद्या दिनांक १० एप्रिल रोजी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याच्या नागपूर विभागाकडून देण्यात आला आहे.

कुठे किती तापमान ?
पुण्यात कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेल्याचे दिसून आले. मात्र संध्याकाळानंतर हवेत गारवा निर्मण झाला होता. दरम्यान राज्यात दिनांक ८ एप्रिल रोजी अकोला आणि जळगाव इथे सर्वाधिक कमाल ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुणे 40.1, लोहगाव 39.9 ,अहमदनगर 42.6, जळगाव 44, कोल्हापूर 36.7 ,महाबळेश्वर 32.5, मालेगाव 32.5, सांगली 39 पॉइंट 9, सातारा 36.8, सोलापूर 41, मुंबई 34.2, सांताक्रुज 34 अंश सेल्सिअस रत्नागिरी 32.9, डहाणू 35.6, उस्मानाबाद 41 पॉइंट 1 ,औरंगाबाद 41.2,नांदेड 41 पॉइंट 6, अकोला 44 ,अमरावती 42 पॉईंट चार ,बुलढाणा 41.5, ब्रम्हपुरी 40.2 ,चंद्रपूर 42 पॉईंट चार, गोंदिया 39.8, नागपूर 39.6, वर्धा 40.8 अशा कमाल तापमानाची नोंद काल राज्यातील प्रमुख शहरांमध्ये करण्यात आलीय.

इस्लामपुरात पावसामुळे बत्ती गुल
दुपारी 4 च्या सुमारास वीज, वादळी वारा व गारांच्या पावसाने इस्लामपूर शहरासह परिसरास झोडपून काढले. तब्बल एक तास वादळी वार्‍यासह पाऊस सुरू होता. त्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेले. अचानक झालेल्या पावसामुळे इस्लामपूर शहराच्या भाजी मार्केट मधील किरकोळ विक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली. शहरातील रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर कोसळल्याने रात्री उशिरापर्यंत इस्लामपूर शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणचे कर्मचार्‍यांकडून युध्दपातळीवर सुरू होते. वादळी वारा व पावसामुळे इस्लामपूर नगरपरिषदेचा एक्सप्रेस फिडरचा विद्युत पुरवठा बंद झाल्याने इस्लामपूर शहरातील उपनगरांमध्ये सायंकाळी होणारा पाणी पुरवठा खंडीत झाला होता.

Leave a Comment

error: Content is protected !!