Weather Update : मागील अनेक दिवसांपासून गायब झालेला मान्सून आता पुन्हा महाराष्ट्रात हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट फोटोवरून राज्यात पुढील २-३ दिवसांत बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे. आज सकाळी ९ वाजता सॅटेलाईटने काढलेल्या फोटोमध्ये महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण दाटलेले दिसत आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार तर पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, बुलडाणा तसेच मुंबई, ठाणे, पालघर यासह मराठवाड्यातील काही भागात मागील २४ तासांत चांगला पाऊस झाला आहे.
राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मराठवाड्यात मात्र पावसाळा अभावी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. चाळीस दिवसापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिके जळून गेली आहेत. शेतकऱ्यांवर पीक उपटून टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
भात उत्पादक शेतकरी संकटात
गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात जवळपास 75 हजार हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. पावसाच्या उघडीपीमुळे भात पीक संकटात सापडले आहे. त्यातच भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पाऊस झाला तरी भाताचे पीक भाताचे उत्पादनात घट होईल असे शेतकरी सांगत आहेत.
नाशिक जिल्ह्यात पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विमा धारक शेतकऱ्यांना 25% आगाऊ रक्कम विमा कंपनीने देण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ५ लाख ८६ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.