Weather Update : महाराष्ट्रातील पावसाचे वातावरण निवळणार; ‘या’ राज्यांना अलर्ट कायम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवडाभर राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने भाग (Weather Update) बदलत हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, मका, बाजरी यासह अन्य रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आजपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण निवळणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह कोकण अशा सर्वच भागांमध्ये राज्यात आज कोरडे हवामान पाहायला मिळणार आहे. याउलट उत्तरेकडील राज्यांमधील पावसाचे वातावरण कायम असून, त्या ठिकाणी आजही जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्र (Weather Update) विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

यवतमाळ येथे देशातील उच्चांकी तापमान (Weather Update In Maharahstra)

राज्यात आठवडाभर झालेल्या पावसानंतर उकाडा (Weather Update) चांगलाच वाढलेला पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात भारतातील उच्चांकी 39.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर वाशीम, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर पोहचला आहे. याशिवाय राज्यातील एक-दोन जिल्हे वगळता मागील 24 तासांमध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये दिवसाचे तापमान हे 35 अंश सेल्सिअसहुन अधिक असल्याचे पाहायला मिळाले आहे. तर किमान तापमानातही मोठी वाढ झाली असून, राज्यातील बऱ्याच भागांमधून थंडी गायब झाली आहे.

‘या’ राज्यांना पावसाचा इशारा कायम

महाराष्ट्रात पावसाचे वातावरण (Weather Update) निवळले असले तरी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) दिल्ली आणि आसपासच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुढील 48 तासांत जोरदार पाऊस तर काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने दिल्ली, पंजाब, चंदीगड, पश्चिम उत्तरप्रदेश या भागांमध्ये आज (ता.3) पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सोमवारी (ता.4) पूर्व उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह अन्य काही ईशान्येकडील भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने म्हटले आहे.

‘या’ भागांना जोरदार तडाखा

दरम्यान, वायव्य भागातून देशात दाखल झालेल्या पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे गेले दोन दिवस अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. यामध्ये प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश अनेक भागांमध्ये पाऊस नोंदवला गेला आहे. या राज्यांमध्ये अनेक भागात लेट रब्बी पिकांना या पावसासह झालेल्या गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. तर अनेक भागांमध्ये काढणीला आलेली पिके खराब झाली आहेत.

error: Content is protected !!