हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाब पट्ट्यामुळे (Weather Update) राज्यासह देशाच्या काही भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता कायम आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कोकणासह अन्य भागांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस (Weather Update) होऊ शकतो. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिणेकडे अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ एक कमी दाब पट्टा (Weather Update) सक्रिय आहे. या कमी दाब पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या काही भागांपर्यंत वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. या चक्राकार स्थितीमुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. परिणामी राज्यात पावसाला पोषक असे वातावरण तयार झाले असून, आजही (ता.६) राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. असे हवामान विभागाने म्हटले आहे.
‘या’ भागांना इशारा (Weather Update Today 6 Jan 2024)
राज्यातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये पुढील दोन दिवस विजांसह पाऊस होऊ शकतो. तर दक्षिणेकडील सांगली, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातही हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. या दोन दिवसांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
किमान तापमानात वाढ
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या किमान तापमानात वाढ झाली असून, उत्तर भारतातील इतर भागांमध्ये दिवसा तापमान सामान्य आणि रात्री अत्यंत थंड वातावरण जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाले असून, किमान तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये आणखी एक कमी दाब पट्टा सक्रिय होऊन शकतो. राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये या कमी दाब पट्ट्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.