Weather Update : पूर्व महाराष्ट्राला गारपिटीने झोडपले; ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची शक्यता!

Weather Update Today 12 Feb 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील पूर्व भागाला सलग दुसऱ्या दिवशीही गारपिटीचा तडाखा (Weather Update) बसला. विदर्भातील गोंदिया वगळता वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यामध्येही गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, आजही राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच 13 आणि 14 फेब्रुवारी या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 15 आणि 16 फेब्रुवारीला राज्यातील पूर्व भागात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

कुठे झाला गारपिटीसह पाऊस? (Weather Update Today 12 Feb 2024)

  • वर्धा जिल्हा – हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव, नांदगाव, वेळा या गावांसह हिंगणघाट शहराला गारपिटीचा तडाखा (Weather Update) बसला. तर समुद्रपूर तालुक्यासह सालापुर, मारडा, कळमना, कोरा, काकरापार, मंगरूळ, रासा, मोहगा या गावांसह जिल्ह्यातील एकूण 25 गावांमध्ये गारपीट झाली आहे.
  • यवतमाळ जिल्हा – यवतमाळ, बाभुळगाव, आर्णी, महागाव आणि उमरखेड तालुक्यातील बोरी, चातारी, सावळेश्वर, माणकेश्वर, गंजगाव, कोपरा, देवसरी या गावांमध्ये गारपिटीसह पाऊस झाला.
  • नागपूर जिल्हा – नागपूर जिल्ह्याच्या खातमारी परिसरात तसेच मौदा तालुक्यालाही गारपिटीचा तडाखा बसला आहे.
  • अमरावती जिल्हा – चांदूर रेल्वे, धामनगाव रेल्वे आणि अन्य काही तालुक्‍यात गारपिटीसह पाऊस झाला आहे.
  • चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांच्याही अनेक भागांमध्ये गारपिटीसह पावसाची नोंद झाली आहे.
  • मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर शहर व तालुका परिसरातही वादळी वाऱ्यासह रविवारी सायंकाळी गारांचा पाऊस झाला.

आजही पावसाची शक्यता

विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांसह आजही (ता.12) पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार असून, 15 आणि 16 फेब्रुवारीला राज्यातील पूर्व भागात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

थंडी, पाऊस, उन्हाची काहिली

दरम्यान, राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम असून, मागील 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी निच्चांकी 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर दक्षिण महाराष्ट्रात खास करून सोलापूरमध्ये दुपारच्या सुमारास तापमानाचा पारा 36.4 अंश सेल्सिअसवर कायम आहे. त्यामुळे एकीकडे थंडी तर दुसरीकडे उन्हाची काहिली तर पूर्व भागात गारपिटीसह पाऊस असे एकाच वेळी राज्यात संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे.