Weather Update : राज्यात थंडी पुन्हा वाढणार; अवकाळीने शेतकऱ्यांचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. १६) राज्यात ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. दरम्यान मागच्या २४ तासात राजस्थानमधील चुरू देशाच्या सपाट भू-भागावरील यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी २.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या बाबतीत महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६ अंश सेल्सिअस होते.

हवामान स्थिती

पूर्व-मध्य बंगालच्या अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. लक्षद्वीपच्या अमनदीवीपासून ६२० किलोमीटर, पणजीपासून ६७० किलोमीटर पश्चिमेकडे असलेली वादळी प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे सरकत आहे. या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरण्याचे संकेत आहेत. तर आग्नेय बंगालच्या उपसागरात विषूववृत्ताजवळ कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

राज्यात थंडी वाढणार..

दरम्यान पुढील दोन ते तीन दिवसानंतर म्हणजे साधारण सोमवारी 19 डिसेंबरपासून संपूर्ण गुजरात आणि महाराष्ट्रात किमान तापमानात 3 डिग्रीने हळूहळू घसरण हणार आहे. त्यामुळं थंडीत दिवसागणिक वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

अवकाळीचा शेती पिकांना फटका

ऐन थंडीच्या दिवसात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात देखील लहरी हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आता रब्बी हंगामात पीक चांगले येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र रब्बीतही अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्यातील हिंगोली, बुलढाणा, रायगड जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, तूर, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय सिंधुदुर्गातील झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि इतर फळपिकांचे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!