हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवडाभरापासून विदर्भ-मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण (Weather Update) होते. काही ठिकाणी गारांसह पावसाची नोंद झाली. अशातच आजपासून राज्यातील पावसाचे वातावरण निवळणार असून, मुख्यतः राज्यातील सर्वच भागांमध्ये निरभ्र आकाश पाहायला मिळणार आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. त्यामुळे आता तुरीसह, हरभरा आणि अन्य रब्बी पिकांची काढणी सुरु असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील आठवडाभरात विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह अवकाळी पावसामुळे (Weather Update) रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अकोला, बुलढाण्यात पाऊस (Weather Update Today 16 Feb 2024)
गुरुवारी (ता.15) संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील बाळापूर, वाडेगाव, उरळ तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव परिसरात अवकाळी पावसाने (Weather Update) जोरदार हजेरी लावली. परिसरात अचानक बरसलेल्या या पावसामुळे काढणीला आलेल्या हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांची ताडपत्रीसह शेतमाल झाकून ठेवण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती.
किमान तापमानात वाढ
दरम्यान, मागील 24 तासांमध्ये राज्यासह देशातील किमान तापमानात वाढ नोंदवली गेली आहे. देशात मागील काही दिवसांमध्ये 2 ते 3 अंशांपर्यंत घसरलेले किमान तापमान सध्या 5.8 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. तर राज्यातही नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी बुधवारी (ता.14) असणारे 8.6 अंश सेल्सिअस निच्चांकी तापमान, मागील 24 तासांमध्ये 10.4 अंशांपर्यंत वाढलेले पाहायला मिळाले. त्यामुळे काही प्रमाणात थंडी कमी झाली आहे.
कमाल तापमानात घट
बुधवारी (ता.14) राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 36.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. त्यात मागील 24 तासांमध्ये घट होऊन, ते 36.0 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. अर्थात मागील आठवड्याच्या शेवटी सोलापुरात कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला होता. मात्र, त्यात सध्या घसरण झालेली दिसून येत आहे. तसेच राज्यातील अन्य भागातही कमाल तापमानात अल्पशी घट दिसून आली आहे.