Weather Update : राज्यात पावसाची उघडीप; आज विदर्भात मात्र विजांसह पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, राज्यातल्या बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. तर काही भागात मात्र अधून मधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावतो आहे. दरम्यान आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी राज्यातल्या बहुतांश भागात पाऊस उघडीप देईल. तर विदर्भ मराठवाड्यात मात्र विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं तिथे पावसाची (Weather Update) शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.आज बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात आज विजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

कुठे कसा पाऊस ?

दरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. नगर, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती कायम होती. कोल्हापूर जिल्ह्यातील गगणबावडा येथे ५० मिलिमीटर पाऊस (Weather Update) झाला. तर पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी या मंडळांमध्येही पावसानं हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस पडला. ओझरखेडा, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगणा मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी श्रावण सरी पडल्या. सांगली जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये हलक्या सरी झाल्या. सातारा जिल्ह्यात काही भागांत मध्यम पाऊस झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!