हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये सध्या तापमानात (Weather Update) मोठी घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम असून, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. अशातच आता आठवड्याच्या शेवटीपर्यंत राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.
यात प्रामुख्याने मध्य प्रदेशलगतच्या खानदेश भागातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्यांच्या तुरळक भागात किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने (Weather Update) म्हटले आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि दक्षिण भारतातून महाराष्ट्रपर्यंत येणाऱ्या निम्न पातळीतून पोहोचणाऱ्या पूर्वझोती वाऱ्यांच्या मिलापातून मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर ते सोलापूर पर्यंतच्या पट्ट्यात तसेच धाराशिव व लातूर जिल्ह्यांमध्येही 31 डिसेंबर ते 2 जानेवारी या तीन दिवसांदरम्यान ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काहीशी थंडी ओसरून ऊबदारपणा जाणवेल. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
थंडी कायम राहणार (Weather Update Today 26 Dec 2023)
उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही हळूहळू तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान 12 अंशाखाली पोहोचले आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिममधील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. वर्षाअखेरसह नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस होऊन, पूरस्थिती निर्माण झाली होती. आता तामिळनाडूमधील जनजीन पूर्वपदावर येत असताना, हवामान विभागाने पुढील काही दिवस पुन्हा दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज असल्याचे म्हटले आहे.