हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. परिणामी राज्यातील तापमानातही (Weather Update) चढ-उतार पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यातील सामान्य तापमानापेक्षा सध्या राज्यातील तापमान वाढले असून, थंडीत काहीशी घट झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये 10 अंशांच्या खाली घसरलेला पारा पुन्हा वर सरकला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आजपासून (ता. 29) किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ (Weather Update) होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.
या भागांत हलका पाऊस? (Weather Update Today 29 December 2023)
दरम्यान, पुढील दोन दिवस उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये दाट धुके (Weather Update) कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यात हळूहळू सुधारणा होऊन, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बलुचिस्थान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागांमध्ये पाऊस आणि हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तर महाराष्ट्रात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील खान्देश पट्ट्यात हलका पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या पंजाब, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंडमध्ये अनेक भागात किमान तापमान 8 ते 12 अंशांच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्तरेकडून महाराष्ट्राकडे येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह काहीसे कमी झाल्याने राज्यात थंडी काहीशी कमी झाली आहे.
राज्यातील काही भागांतील तापमान
धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे वगळता उर्वरित राज्यात तापमानाचा पारा 10 अंशांच्या वर सरकला आहे. गेल्या 24 तासांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे 31.3 (12.1), धुळे 33.0 (9.4), जळगाव 29.9 (13.9), कोल्हापूर (17.2), महाबळेश्वर 26.2 (14.6), नाशिक 32.3 (14.1), निफाड 30.4 (11.2), सांगली 31.8 (16.8), सातारा 32.2(13.8), सोलापूर 32.2(16.4), सांताक्रूझ 34.0 (19.8), डहाणू 28.3 (19.6), रत्नागिरी 36.3 (21.6), छत्रपती संभाजीनगर 30.6 (13.0), नांदेड 30.2 (16.0), परभणी 30.1 (13.8), अकोला 31.8 (15.3), अमरावती 30.6 (14.9), बुलडाणा 31.2 (15.4), ब्रह्मपुरी 32.5 (14.2), चंद्रपूर 29.2(13.0), गडचिरोली 30.0 (13.0), गोंदिया 28.5 (12.4), नागपूर 29.6(14.8), वर्धा 29.5(15.0), वाशीम 30.2 (14.4), यवतमाळ 30.0 (13.0).