Weather Update : ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता; पहा महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पश्चिमी चक्रवातामुळे सध्या देशातील वातावरणात (Weather Update) मोठा बदल पाहायला मिळतोय. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा, उत्तर प्रदेशसह बिहारच्या काही भागात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. यात प्रामुख्याने जम्मू, काश्मीर, लडाखचा काही भाग, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ भागात बर्फवृष्टी (Weather Update) देखील होऊ शकते. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.

राज्यातील तापमानात चढ-उतार (Weather Update Today 31 Jan 2024)

परिणामस्वरूप, उत्तरेकडील ढगाळ वातावरणामुळे (Weather Update) महाराष्ट्रातील किमान तापमानात काहीशी वाढ झाली असून, राज्यातील निफाड वगळता जवळपास सर्वच भागांमध्ये सध्या किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसच्या वरती असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात किमान तापमानातील चढ-उतार सुरूच असून, अल्प वाढीनंतर राज्यातील किमान तापमानात पुन्हा काहीशी घट होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

थंडीचा कडाका वाढणार

मागील आठवड्याच्या शेवटी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, निफाड, जळगाव या ठिकाणी किमान तापमानात अनुक्रमे 6.8, 8.2, 9.9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण झाली होती. मात्र, मागील 24 तासांमध्ये या तीन ठिकाणी किमान तापमान अनुक्रमे 10.9, 9.8, 10.5, अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर राज्यातील उर्वरित भागांमध्ये किमान तापमान 10 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमधून गेले तीन-चार दिवस थंडी गायब झाली होती. मात्र आता पुन्हा किमान तापमानात घट होण्याचा अंदाज असून, उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे राज्यातील काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पुढील तीन दिवस पश्चिमी चक्रवाताचा सर्वाधिक परिणाम वायव्य भारतावर होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे. तर तिकडे पूर्वेकडे पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात देखील या कालावधीत गारपीट होण्याची शक्यता आहे. पंजाब, चंदीगड, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!