Weather Update : 4 ते 5 दिवसात महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता – आयएमडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात झालेल्या या बदलामुळे मागील दोन ते तीन दिवस राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) दिल्लीसह उत्तरेकडील काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यातच आता पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रातही काही भागांमध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) (Weather Update) व्यक्त केला आहे.

‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता (Weather Update Today 5 Feb 2024)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ढगाळ वातावरणामुळे (Weather Update) प्रामुख्याने या आठवड्याच्या शेवटीपर्यंत विदर्भांत काही ठिकाणी जोरदार तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला उत्तरेकडील राज्यांमध्ये ढगाळ हवामानासह पाऊस बरसत असल्याने, त्या ठिकाणाहून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान 10 अंशांच्या वर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आणखी वाढ होऊन, राज्यात 14 ते 24 अंशादरम्यान किमान तापमान राहू शकते, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उत्तरेकडे पावसाची शक्यता कायम

हवामान विभागाने महाराष्ट्रासह 13 राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. यानुसार पंजाब, चंदीगड, राजधानी दिल्ली या भागांमध्ये सध्या पाऊस तर जम्मू-काश्मीरच्या काही भागांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम या पूर्वेकडील भागांमध्येही हलक्या पावसाची नोंद झाली आहे. अशातच पुढील 24 तासांमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या पूर्वेकडील राज्यांमध्ये हलका पाऊस आणि हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. आसामच्या काही भागांमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

पावसानंतर थंडी वाढणार

सध्यस्थितीत, उत्तर भारतात काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे अनेक भागातील तापमानात वाढ झाली आहे. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये पावसाचे वातावरण निवळल्यानंतर उत्तरेकडील राज्यात पुन्हा थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे हवेतील गारवा वाढण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!