हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात गुरुवारी ‘मनडूस’ चक्रीवादळाची निर्मिती (Weather Update) झाली आहे. वायव्य दिशेकडे सरकत असलेली ही वादळी प्रणाली आज दिनांक ९ रोजी मध्य रात्रीपर्यंत पूर्व किनाऱ्यावरील पदुच्चेरी ते श्रीहरीकोट्टा दरम्यान किनाऱ्याला धडकणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे.
‘मनडूस’ चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ‘मनडूस’ चक्रीवादळ तयार झाले आहे. गुरुवारी (ता. ८) दुपारी ही प्रणाली कारईकलपासून आग्नेयेकडे ४६० किलोमीटर, तर चेन्नईपासून ५५० किलोमीटर (Weather Update) आग्नेयेकडे होती. समुद्रात ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणाऱ्या वादळाचे केंद्र ताशी ११ किमी वेगाने वायव्य दिशेकडे सरकत होते. चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेशसह, श्रीलंकेत ढगांची दाटी झाली आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक, केरळ, महाराष्ट्रासह विविध राज्यांत ढग जमा होत आहेत.
राज्यातील या भागात आज पावसाची शक्यता
राज्यात थंडी कमी झाली आहे. चक्री वादळाचा परिणाम म्हणून राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
किमान तापमान(Weather Update)
दरम्यान मागच्या २४ तासात राजस्थानातील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३४.५ अंश तापमान नोंदले गेले.