हिवाळ्यात कसा असावा शेळ्या, मेंढ्यांचा आहार? कोणते होतात आजार ? काय घ्यावी काळजी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी, पशुपालकांनो जर तुम्ही शेळी , मेंढी पालन करीत असला तर हा लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल. हिवाळ्यात शेळ्या मेंढ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्यांचा आहार कसा असावा ? कोणते आजार त्यांना होतात ? त्यांची काळजी कशी घ्यावी याबाबतची माहिती घेऊया…

१) शेळ्या, मेंढ्यांच्या वजनवाढीसाठी हा काळ योग्य असल्यामुळे वजनाच्या अर्धा टक्के किंवा १०० ते २५० ग्रॅम खुराक द्यावा.
हिवाळ्यात वाढत्या वयाच्या करडांना जास्त चांगल्या प्रतीचा चारा आवश्यक असतो. याशिवाय ३ ते ४ आठवड्यांनंतर करडांना दररोज प्रत्येकी ५० ग्रॅम आंबोण मिश्रण आणि खातील तेवढी हिरवी वैरण देणे आवश्यक आहे.

२) आंबोणाचे रोजचे प्रमाण हळूहळू वाढवत जाऊन रोज प्रत्येकी २५० ग्रॅमपर्यंत आणावे. साधारणत: चार महिन्यांनंतर वयात येईपर्यंत, मटणासाठी विकण्यापर्यंत त्यांना चांगल्या प्रकारची वैरण पुरेशी असते. ती उपलब्ध नसल्यास वैरणीशिवाय २०० ते २५० ग्रॅम आंबोण मिश्रण करडांना मिळणे आवश्यक आहे. चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो.

३) करडांच्या आहाराचे दोन भाग म्हणजे वैरण आणि आंबोण. आंबोण म्हणजे प्रथिने, ऊर्जा पुरवणारे खाद्य घटक म्हणजे वेगवेगळी धान्ये (मका, गहू, ज्वारी) आणि त्यांचे दुय्यम पदार्थ (उदा. कोंडा आणि पॉलिश गव्हाचा कोंडा वगैरे). प्रथिने पुरवण्याकरिता वेगवेगळ्या तेलबियांच्या पेंडीचा (उदा. शेंगदाणा, तीळ, सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, खोबरे, करडई वगैरे) समावेश करावा. याशिवाय डाळ तयार झाल्यावर उपलब्ध होणारी चुणी (तूर, चणा, उडीद चुणी इ.) सुद्धा प्रथिनांच्या दृष्टीने उपयुक्त आहे. यातून शरीर थंडीत उबदार राहण्यास मदत होते.

४) आहार बदल हळूहळू करावा. अचानक करू नये नाहीतर त्यातून आजार आणि पोटफुगी होते. शेळ्यांना ओला व सुका चारा देणे गरजेचे आहे. आहार नेहमी जास्त ऊर्जा निर्माण करणारा ठेवावा, कारण थंडीत शरीराचे तापमान नियमित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज भासते.

आजार आणि उपाययोजना

१) आजाराचे मुख्य कारण म्हणजे जिवाणू, विषाणू आणि जंत प्रादुर्भाव. थंडीमध्ये आजार लवकर पसरतात कारण जिवाणू व विषाणू थंड तापमानात जास्त वेळ टिकून राहतात, त्यामुळे गोठा जंतुनाशकाने आठवड्यातून १ ते २ वेळा धुवावा.
२) बाह्य परजीवीची हिवाळ्यात अंधाऱ्या, थंड आणि ओलसर जागेत झपाट्याने वाढ होते. ज्या करडांमध्ये जंत प्रादुर्भाव असेल ती करडे कमकुवत आणि संथ असतात. शरीरातील लोह आणि धातूचे प्रमाण कमी होऊन वजनात घट होते आणि शरीर खंगते. परजीवीमुळे लहान करडांना काही आजार होतात.

३) रक्ती हगवणीमध्ये करडांची वाढ खुंटते किंवा ती अतिसाराने मरण पावतात. आतील आणि बाह्य परजीवीमुळे करडांना शरीराचे तापमान हिवाळ्यात स्थिर राखणे अवघड जाते.
४) जंत हे अन्नद्रव्ये, अन्नरस आणि रक्ताचे शोषण करतात. आतड्यातील अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या ग्रंथीना इजा पोहोचवितात. त्यामुळे अनेमिया (पंडुरोग) होतो. आजूबाजूच्या परिसरात चरण्यासाठी गवतावर दव असताना सकाळी सकाळी सोडू नये. कारण या वेळात जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.

५) करडांना आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले. म्हणून करडांना ठरल्यावेळी रोगप्रतिबंधक लस आणि जंतुनाशक औषधे द्यावीत. शेळ्यांना लस कधीही आजार आल्यानंतर देऊ नये, कारण आजारी व विशिष्ट साथीमध्ये आजारी शेळीला लस दिल्यास तो आजार बरा न होता बळावतो.

६) हिवाळ्यात करडांवरील पिसू, गोचिड यांचे योग्य वेळेस नियंत्रण करणे आवश्यक आहे. अन्यथा, हे करडांच्या अंगावर, केसांच्या खाली राहून त्यांचे रक्त पितात. यामुळे करडू अस्वस्थ होते आणि त्यांना रक्तक्षय होण्याची शक्यता असते. त्यांच्या चावण्यामुळे खाज सुटते आणि करडू शरीरावर तोंडाने चावा घेते. यामुळे तेथील केस गळणे, जखमा होतात. उवा, पिसू, गोचीड यांचा उपद्रव टाळण्यासाठी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने गोचिडनाशकाचा वापर करावा. संपूर्ण अंगावर हे द्रावण लावावे. द्रावण तोंड, डोळे या ठिकाणी लावू नये. हे द्रावण पोटात गेल्यास विषबाधा होऊ शकते.

error: Content is protected !!