हेलो कृषी ऑनलाईन : गहू हे राज्यात रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. गहू हे पीक (Wheat Crop) जिरायत व बागायती अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते. देशाच्या सरासरी उत्पादनाचा विचार करता गव्हाचे सरासरी उत्पादन कमी आहे. सुधारीत वाणांचा वापर न करणे, अपूरे पाणी व्यवस्थापन, कोरडवाहू गव्हाची लागवड अशी उत्पादन कमी येण्याची कारणे आहेत. गव्हाच्या उत्पादनवाढीसाठी सुधारीत वाणांचा वाणांचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
गहू लागवडीसाठी (Wheat Crop) जमीन कोणती निवडावी?
पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड बागायती गहू (Wheat Crop) लागवडीसाठी करावी. तसेच भरखते व रासायनिक खताचा योग्य वापर केल्यास मध्यम जमिनीतही चांगले उत्पादन मिळते. जिरायती गव्हाची लागवड जमिनीत ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी जमिनीत करावी.
पेरणीची वेळ
जिरायती गव्हाची लागवड करायची असल्यास त्याची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी वेळेवर म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबर नंतर केल्यास प्रत्येक आठवड्यात हेक्टरी 2.5 क्विंटल उत्पादनात घट येते.
जमिनीची मशागत
गहू पिकाच्या (Wheat Crop) मुळ्या जमिनीत खोलवर जातात. त्यामुळे गहू लागवडीपूर्वी जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे. खरीप पीक काढणीनंतर 15 ते 20 सें.मी. खोलीवर जमिनीची नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. त्यामुळे जमीन भुसभुशीत होते. शेवटच्या कुळवणीपूर्वी 10 ते 12 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत पसरावे.
गव्हाचे सुधारीत वाण
- बरेसचे शेतकरी भात पिकानंतर गहू पिकाची लागवड करतात. भात पीक काढणीनंतर गहू लागवड करायची असल्यास तसेच दोन ते तीन पाण्याच्या पाळ्यांची सुविधा असल्यास उशिरा पेरणीसाठी निफाड- 34 या वाणाची निवड करावी. या वाणाची शिफारस उशिरा बागायती पेरणीसाठी करण्यात आली आहे.
- एन आय ए डब्ल्यू- 301 (त्र्यंबक), एन आय ए डब्ल्यू- 917 (तपोवन), एम ए सी एस- 6222 हे सरबत्ती वाण व एन आय डी डब्ल्यू-295 (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणीसाठी योग्य आहे.
- बागायती उशिरा पेरणीसाठी एन आय ए डब्ल्यू- 34 आणि ए के ए डब्ल्यू-4627 या वाणाची तर जिरायती पेरणीसाठी एन आय डी डब्ल्यू- 15 (पंचवटी) ए के डी डब्ल्यू- 2997-16 (शरद) हे वाण उपयुक्त आहेत.
- पाण्याची उपलब्धता कमी असल्यास एन आय ए डब्ल्यू- 1415 (नेत्रावती) व एच डी 2987 (पुसा बहार) या सरबती वाणांची लागवड करावी.