Coconut Tree Plantation : नारळासाठी कसे पाहिजे हवामान? सुधारित जाती कोणत्या?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । नारळाची लागवड (Coconut Tree Plantation) उष्ण कटिबंधातील भागात चांगल्या प्रकारे होते. मंद वाहणारे वारे, जास्त आणि विखुरलेला पाऊस, दमट हवामान आणि हवेत भरपूर आर्द्रता असलेल्या प्रदेशात नारळाची झाडे चांगली वाढतात. उष्ण व कोरड्या प्रदेशात नारळाची योग्य वाढ होत नाही. नारळाच्या झाडाची वाढ 15 ते 37 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नारळाच्या झाडाच्या वाढीला हानीकारक असते. समुद्राजवळच्या भागातील हवामानात विशेष बदल होत नाहीत असे हवामान नारळाच्या वाढीसाठी पोषक असते. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील हवामान उष्ण व कोरडे असते. तसेच दिवस व रात्रीच्या हवामानामध्ये बराच फरक असतो. अशा हवामानात नारळाच्या पिकात फळधारणा कमी होते आणि फळातील खोबऱ्याची जाडी कमी असते. मात्र योग्य काळजी घेतल्यास विदर्भाच्या काही भागांत मर्यादित प्रमाणावर नारळाची लागवड करण्यास बराच वाव आहे.

नारळ हे बागायती फळझाड असून पाण्याची सोय असल्यास विविध प्रकारच्या पण उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत या पिकाची लागवड (Coconut Tree Plantation) करता येते. गाळाने तयार झालेल्या भुसभुशीत, समुद्रकाठच्या रेताड, वाळुमय जमिनी आणि मध्यम भारी जमिनी नारळाच्या लागवडीसाठी उपयुक्त असतात. अतिभारी, चिकण व पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसलेल्या जमिनीवर नारळाची लागवड करू नये. पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करून (मोठे चर खोदून) नारळ लागवड करणे शक्य आहे. सुधारलेल्या खार जमिनीतही नारळाची लागवड करता येते. भाताच्या खाचरात नारळाची लागवड करू नये. खाचराच्या रुंद बांधावर तसेच ज्या जमिनीमध्ये पाण्याची पातळी खूप वर आहे अशा ठिकाणी जमिनीच्या तालीवर नारळाची लागवड करावी.

नारळाच्या सुधारित जाती – Coconut Tree Plantation

नारळाच्या झाडाच्या उंचीवरून नारळाच्या जातींची विभागणी उंच वाढणाऱ्या जाती आणि बुटक्या जाती अशी केली जाते. बाणावली ही उंच वाढणारी जात आहे तर ऑरेंज ड्वार्फ ही बुटकी जात आहे.

1) बाणावली : नारळाच्या या जातीला ‘वेस्ट कोस्ट टॉल’ असेही म्हणतात. या जातीच्या झाडांना 8 ते 10 वर्षांनी फळे येतात. या जातीच्या झाडाची फळे मोठी असून त्यातील खोबरे जाड असते. फळातील तेलाचे प्रमाण 70 % असते. या जातीची झाडे 80 ते 100 वर्षांपर्यंत फळे देतात. नारळाच्या या जातीवर किडींचा आणि रोगांचा उपद्रव कमी प्रमाणात दिसून येतो.

2) ऑरेंज ड्वार्फ : नारळाच्या या जातीला ‘सिंगापुरी’ असेही म्हणतात. या जातीची झाडे कमी उंचीची असून फळे नारिंगी रंगाची असतात. नारळाच्या या जातीला 4 ते 5 वर्षांत फळे येतात. या जातीची फळे आकाराने लहान असतात आणि फळातील तेलाचे प्रमाण 55 % असते. या जातीची झाडे 40 ते 50 वर्षांपर्यंत फळे देतात. नारळाच्या या जातीवर कीड व रोगाचे प्रमाण जास्त दिसून येते.

3) टी X डी (टॉल X ड्वार्फ ) : उंच आणि बुटक्या अशा दोन जातींचा संकर करून टी x डी ही नारळाची संकरित जात तयार करण्यात आली आहे. या संकरित जातीत नारळाच्या उंच जातीच्या उत्तम खोबऱ्याचा गुणधर्म व बुटक्या जातीचा लवकर फळे धरण्याचा गुणधर्म एकत्र झालेला आहे. नारळाच्या या जातीला 4 ते 5 वर्षांनी फळे येतात. फळे आकाराने मोठी असतात. या जातीच्या एका झाडापासून दरवर्षी सरासरी 100 ते 125 फळे मिळतात.

4) प्रताप -ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने विकसित केली आहे. या जातीचे नारळ मोठे, भरपूर खोबऱ्याचे असून झाडाची उत्पादन क्षमताही चांगली आहे.

5) लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्प ) -ही जात निवड पद्धतीने विकसित केली आहे. पूर्ण वाढीच्या झाडापासून प्रत्येक वर्षी सरासरी 151 फळे मिळतात. या जातीच्या नारळांमध्ये तेलाचे प्रमाण 72% आहे.

6) फिलिपीन्स ऑर्डिनरी : या जातीचे माड उंच वाढतात. पूर्ण वाढलेल्या माडापासून सरासरी 105 नारळ मिळतात. नारळाचा (Coconut Tree Plantation) आकार मोठा असून त्यापासून सुमारे 213 ग्रॅम खोबरे मिळते. नारळामध्ये तेलाचे प्रमाण 69% आहे.

error: Content is protected !!