Cotton Farming : तुम्हाला ‘हे’ कपाशी बीजोत्पादन तंत्रज्ञान माहिती आहे का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्र राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पीक असून 2014 मध्ये त्याखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या 33.51% ( 38.72 लाख हेक्टर) क्षेत्र इतके होते.

हवामान-

कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान 15 ते 35 अंश सेल्सिअस व हवेतील आर्द्रता 75% इतकी असावी लागते.

जमीन –

कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (90 सेंमी.) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू साधारणतः 6 ते 8.5 असावा. त्या जमिनीत मागील हंगामात कपाशीचे पीक घेतलेले नसावे

पूर्वमशागत –

कपाशीच्या मुळाची वाढ चांगली व्हावी यासाठी एक खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकांची धसकटे व इतर कचरा गोळा करून तो जाळावा व शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड व रोग यांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. नंतर योग्य अशा अंतरावर सऱ्या पाडाव्यात.

पेरणीची वेळ –

उन्हाळी कापूस बीजोत्पादनासाठी फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत आणि पावसाळी कापूस बीजोत्पादनासाठी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत पेरणी करावी.

बियाण्याचा स्रोत –

बियाण्याचा स्रोत हा मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणित केलेला असावा. पायाभूत बियाण्यासाठी मूलभूत बियाणे व प्रमाणित बियाण्यासाठी पायाभूत बियाणे वापरावे.

विलगीकरण अंतर –

कापूस हे स्वयंपरागत पीक आहे. परंतु नैसर्गिक परपरागीभवन हे वाऱ्यामुळे किंवा कीटकामार्फत 10 ते 50% होऊ शकते. त्यासाठी कपाशीच्या संकरित व सरळवाणांमध्ये एका वाणापासून दुसऱ्या वाणाचे विलगीकरण अंतर पायाभूत बियाण्यांमध्ये 50 मीटर असावे व प्रमाणित बियाण्यामध्ये 30 मीटर एवढे विलगीकरण अंतर असते.

बियाण्याचे प्रमाण –

सरळ वाणासाठी हेक्टरी 7.5 किलो बियाणे लागते. तर संकरित वाणासाठी नर वाणाचे हेक्टरी 2 किलो आणि मादी वाणाचे हेक्टरी 4 किलो बियाणे लागते.

पेरणीचे अंतर –

नर वाणामध्ये जास्त कालावधीसाठी 90 x 30 सेंमी. तर कमी कालावधीचे 60 X 30 सेंमी. आणि मादी वाणामध्ये मादी झाडांसाठी 120 x 60 सेंमी. अंतरावर, तर नर झाडांसाठी 90 x 60 सेंमी. अंतरावर पेरणी करावी. पेरणीचे अंतरावर झाडाच्या व वाणांच्या प्रकारानुसार फेरबदल होऊ शकतो.

संकरित वाणांचे नर व मादी झाडांचे ओळीचे प्रमाण कापसामध्ये हाताने संकर करण्याच्या पद्धतीचा उपयोग फायदेशीर ठरतो. त्यासाठी एच x एच वाणासाठी मादी वाणाच्या 2 ओळी व नर वाणाची 1 ओळ याप्रमाणे लागवड करावी. एच x बी वाणासाठी मादी वाणाच्या ओळीची लागवड करावी. डिप्लॉइड कपाशीसाठी मादी वाणाच्या 2 ओळी आणि नर वाणाची 1 ओळ याप्रमाणे लागवड करावी.

बीजप्रक्रिया –

बियाण्यास थायरम या बुरशीनाशकाची प्रतिकिलो बियाण्यास 3 ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

error: Content is protected !!