दुग्धव्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे? गाई व म्हशींची निवड आणि उद्योगासाठी आवश्यक बाबी समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dairy Farming Business Management : स्वयं-रोजगारासाठी दुग्धव्यवसाय प्रकल्प (Dairy Farming Project) स्थापन करण्यासाठी किमान एक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली (बागायती) असावे. तेथे किमान पाच ते दहा दुभत्या गाई/म्हशी यांच्या संगोपनासाठी सर्व मूलभूत सोयी उपलब्ध असाव्यात. उदाहरणार्थ, पिण्याचे पाणी, लाईट, बारमाही वाहतुकीचा रस्ता, फोन, इत्यादी. निवड केलेली जागा नजीकच्या मोठ्या शहरापासून 20 ते 25 कि.मी. परिसरात असावी. उपलब्ध क्षेत्रात हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी सिंचनाची सोय असावी. नजीकच्या ठिकाणी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध असावी.

गोठ्यासाठी जागा निवडताना बारमाही वाहतुकीच्या रस्त्यापासून किंचित अंतरावर निवडावी. यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळता येईल. प्रकल्पातील दुधाची बाजारपेठेत जलद वाहतूक करण्यासाठी स्वयंचलित वाहन उपलब्ध असावे. गाई/ म्हशींना पिण्यासाठी जे पाणी उपलब्ध आहे ते प्रदूषणमुक्त असल्याची खात्री करून घेण्यासाठी पाण्याचे नमुने नजीकच्या प्रयोगशाळेत तपासून घ्यावेत व आवश्यकतेनुसार पाणी शुद्ध व निर्जंतूक करण्यासाठी उपाययोजना करावी.

गाई/ म्हशींची दैनंदिन देखभाल करण्यासाठी प्रकल्पाच्या जागेवर गोठ्याच्या जवळच एक खोली बांधून संबंधित व्यक्तीस तेथे राहण्याची सोय करावी. दुभत्या गाई/ म्हशींना दैनंदिन आहारात लागणारे पशुखाद्य, प्रथमोपचारासाठी आवश्यक औषधे व दूध काढण्यासाठी बादली, दुधाची कॅन, स्प्रिंगचा काटा (तराजू), तसेच आवश्यक उपकरणांमध्ये प्रामुख्याने हिरवा / वाळलेला चारा, वैरण कातरून बारीक करण्यासाठी कडबाकुटी यंत्र उपलब्ध असावे. दुभत्या गाई/ म्हशींच्या दैनंदिन दूध उत्पादनासंबंधी नोंदी ठेवण्यासाठी नोंदवही ठेवावी. Dairy Farming Business Management

म्हशी आजारी असल्यास त्यांच्या उपचारासंबंधी नोंदी ठेवाव्यात. दैनंदिन उपयोगात आणलेले पशुखाद्य, चारा, वैरण, इत्यादींसंबंधी नोंदी ठेवाव्यात. यामुळे वार्षिक ताळेबंद तयार करून प्रकल्पाचे नफा-तोटा पत्रक तयार करता येईल. प्रकल्पासाठी निवडलेली जागा स्वतः च्या मालकीहक्काची असावी. त्याशिवाय प्रकल्पासाठी बँकेतर्फे कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी दुग्धव्यवसायाचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते.

दुग्धव्यवसायाचे व्यवस्थापन गाई म्हशींची निवड

दुग्धव्यवसायासाठी गाई / म्हशी खरेदी करण्यापूर्वी त्यांची निवड करताना खालील मुद्दे विचारात घ्यावेत :

(01) गाय / म्हैस ज्या जातीची खरेदी करावयाची आहे, त्या जातीचे गुणधर्म, रंग, रूप, इत्यादी पाहावे. शक्य असल्यास तिची वंशावळ पाहावी.

(02) गाई / म्हशीची ठेवण त्रिकोणाकृती बांधणीची, सुदृढ व निकोप असावी. कास भरदार असावी. त्वचा मऊ व चमकदार असावी. तिची नाकपुडी ओलसर असावी.

(03) गाई / म्हशींचे दिवसभरात 24 तासांत तीन वेळा दूध काढून त्यांच्या दूध उत्पादनाची खात्री करून घ्यावी. त्यामुळे संभाव्य फसगत टळते.

(04) गाय / म्हैस पान्हा चोरते का ? चार सडातून दूध येते का? दूध काढताना त्रास देते का ?
हे तपासून पाहावे. कास मऊ असावी. लोंबती नसावी.

(05) गाई/ म्हशीची चारही सडे सारख्या आकाराची असावीत व हातात धरून दूध काढण्यास योग्य असावीत. चारपेक्षा जास्त सड असणाऱ्या गाई/म्हशी शक्यतो टाळाव्यात.

(06) दूध काढल्यावर कासेला पुष्कळ वळकट्या पडलेल्या दिसतात. गायी/ म्हशींची दूध देण्याची क्षमता जास्त असावी.

(07) गाई/ म्हशींच्या विशेष सवयी असतील, तर त्यांसंबंधी माहिती करून घ्यावी. उदाहरणार्थ, खुराक, दूध काढण्याच्या वेळा, इत्यादी.

(08) दुग्धव्यवसायाच्या दृष्टीने एका वितात गाईने साधारणपणे 3,600 लिटर दूध द्यावे व म्हशीने 2,500 लिटर दूध द्यावे, अशी अपेक्षा आहे, तरच व्यवसाय किफायतशीर ठरेल.

error: Content is protected !!